रामनाथनचा धमाका
By admin | Published: June 28, 2017 12:48 AM2017-06-28T00:48:37+5:302017-06-28T00:48:37+5:30
भारताच्या रामकुमार रामनाथनने अंताल्या ओपन टेनिस स्पर्धेच्या उप-उपांत्यपुर्व फेरीत खळबळजनक निकालाची नोंद करताना
अंताल्या (तुर्कस्थान) : भारताच्या रामकुमार रामनाथनने अंताल्या ओपन टेनिस स्पर्धेच्या उप-उपांत्यपुर्व फेरीत खळबळजनक निकालाची नोंद करताना जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या डॉमनिक थिएमचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. रामनाथनच्या कारकिर्दीमधील हा सर्वात मोठा विजय आहे.
जागतिक क्रमवारीत २२२व्या स्थानावर असलेल्या रामनाथनने सर्वांना आश्चर्याचा धक्का देताना डॉमनिकला ६-३, ६-२ असा धक्का देत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. त्याने आक्रमक खेळाच्या जोरावर आॅस्टे्रलियाई खेळाडूचे तगडे आव्हान केवळ ५९ मिनिटांमध्ये परतावून लावले. यासह रामनाथनने अंतिम आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळवताना इतर खेळाडूंना धोक्याचा इशारा दिला. एटीपी क्रमवारीत अव्वल १० मध्ये असलेल्या खेळाडूविरुध्द मिळवलेला रामनाथचा हा पहिला विजय आहे.
हा धमाकेदार विजय मिळवल्यानंतर रामनाथनने, ‘या विजयासाठी मी खरंच खूप मेहनत घेतली आहे,’ अशी प्रतिक्रीया दिली. तसेच, यानंतर भारताचा डेव्हिस कप कर्णधार महेश भूपतीनेही ट्वीट केले की, ‘रामकुमारसाठी हा एक रोमांचक विजय ठरला. अव्वल १० मध्ये समावेश असलेल्या खेळाडूला नमवल्यानंतर त्याचा आत्मविश्वास खूप वाढेल. तो काय करु शकतो याची प्रचिती येईल.’ रामनाथनने पहिल्या फेरीतही दमदार बाजी मारत ब्राझीलच्या रोजेरियो दुत्रा सिल्वाला ६-३, ६-४ असे नमवून विजयी सलामी दिली होती. (वृत्तसंस्था)