फोगट भगिनींची हकालपट्टी, परवानगी न घेता रितू, संगीताने सोडले होते शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:21 AM2018-05-18T00:21:51+5:302018-05-18T00:21:51+5:30
गीता, बबिता, रितू आणि संगीता या चारही फोगट भगिनींना बेशिस्तपणामुळे लखनौच्या राष्ट्रीय शिबिरात ‘नो एन्ट्री’ असल्याचे कुस्ती महासंघाने गुरुवारी स्पष्ट केले.
नवी दिल्ली : गीता, बबिता, रितू आणि संगीता या चारही फोगट भगिनींना बेशिस्तपणामुळे लखनौच्या राष्ट्रीय शिबिरात ‘नो एन्ट्री’ असल्याचे कुस्ती महासंघाने गुरुवारी स्पष्ट केले. आशियाडसाठी सुरू असलेल्या तयारी शिबिरातून अचानक बेपत्ता झालेल्या या भगिनींपैकी बबिताने जखमी असल्याचा दावा केला.
‘दंगल’ या हिंदी चित्रपटामुळे अधिक लोकप्रिय ठरलेल्या गीता, बबिता, रितू आणि संगीता या चारही फोगट भगिनी सुरू असलेल्या शिबिरात कोणतीही पूर्वसूचना न देता अनुपस्थित राहिल्यामुळे कुस्ती महासंघाने ही कडक कारवाई केली.
याआधी बेशिस्तीच्या तक्रारी येऊनही गीता आणि बबिता यांच्या बाबतीत महासंघ नरमाईची भूमिका घेतो, असे म्हटले जात होते. मात्र आता तसे न करता महासंघाने चारही भगिनींना शिबिरातून हाकलून दिले. या चौघींना त्यांच्या या वागणुकीबाबत कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली. शिबिरातील खेळाडूंना एशियाडमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. मात्र फोगट भगिनींना या स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार नाही, असे महासंघाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, आपण दुखापतग्रस्त असल्याने शिबिरात सहभागी होऊ शकलो नसल्याचे बबिताने सांगितले आहे. मात्र गीता आणि इतर दोघींच्या अनुपस्थितीबाबत काहीही कल्पना नसल्याचे तिने स्पष्ट केले. मी आतापर्यंत शिबिरात गेले नाही. माझ्या दोन्ही गुडघ्यांना जखम आहे. मी महासंघाला हे कळविले नव्हते पण आजच माहिती देणार आहे. कुठलीही नोटीस मिळालेली नाही, असे ती म्हणाली. गीता बेंगळुरू येथे असून मी जेएसडब्ल्यू सेंटरमध्ये उपचारासाठी जात असल्याचे बबिताने सांगितले.
पुरुष व महिलांचे राष्टÑीय शिबिर १० ते २५ मे या कालावधीत अनुक्रमे सोनीपत व लखनौ येथे होईल. मल्ल साक्षी मलिकव व तिचा पती सत्यव्रत कदियान हे दोघेही शिबिराबाहेर आहेत. (वृत्तसंस्था)