पदक पटकावण्यासाठी विदेशात प्रशिक्षण आवश्यक : साक्षी मलिक
By admin | Published: October 31, 2016 07:08 PM2016-10-31T19:08:21+5:302016-10-31T19:08:21+5:30
आॅलिम्पिकमध्ये अधिक पदके पटकावण्यासाठी सुरुवातीपासून तयारी करायला हवी आणि खेळाडूंना विदेशात प्रशिक्षण द्यायला हवे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - आॅलिम्पिकमध्ये अधिक पदके पटकावण्यासाठी सुरुवातीपासून तयारी करायला हवी आणि खेळाडूंना विदेशात प्रशिक्षण द्यायला हवे, असे मत रिओ आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची मानकरी ठरलेली महिला मल्ल साक्षी मलिकने
व्यक्त केले. साक्षी म्हणाली,‘पीडब्ल्यूएल प्रारंभ होण्यापूर्वी प्रत्येक संघासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन होणे आवश्यक आहे. त्यामुळे विशेषत: भारतीय खेळाडूंना आॅलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंकडून शिकण्याची संधी मिळेल. या शिबिराच्या माध्यमातून भारतीय खेळाडूंना आपल्या उणिवा दूर करता येतील.’ शिबिर केवळ औपचारिकता पूर्ण करणारे असू नयेत, यावरही साक्षीने विशेष भर दिला.
साक्षीने राष्ट्रीय संघातील खेळाडूंना विदेशात खेळण्याचा अनुभव मिळावा, यावर अधिक भर दिला. साक्षी म्हणाली,‘पुढील आॅलिम्पिकची तयारी आतापासून सुरू व्हायला हवी. मल्लांसाठी डॉक्टरांपासून फिजिओपर्यंतच्या सर्व सुविधा मिळायला हव्यात.’ भारतातील महिला कुस्तीच्या स्थितीबाबत साक्षी समाधानी नाही. भारतात हजारो मल्ल सराव करतात पण, पदक केवळ एक मिळाले, असेही सांगताना साक्षी म्हणाली,‘कुस्ती या खेळात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हायला हवे.’ स्वागत समारंभामुळे माझ्या तयारीवर प्रभाव पडला असला तरी पीडब्ल्यूएलमध्ये तयारीसह उतरणार असल्याचे साक्षीने स्पष्ट केले. आगामी आशियाई व विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक पटकावण्याचे लक्ष्य असल्याचे सांगताना साक्षीने आॅलिम्पिकमध्ये कामगिरीत सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. विवाहनंतरही मल्लांच्या कुटुंबाची सदस्य होणार असल्याचा अभिमान वाटत
असल्याचे साक्षीने सांगितले. साक्षीचे पती सत्यव्रत कादियान राष्ट्रीय चॅम्पियन असून ९७ किलो वजनगटात आंतरराष्ट्रीय मल्ल आहेत.