पाकिस्तान-बांगलादेश समोरासमोर
By admin | Published: March 16, 2016 08:39 AM2016-03-16T08:39:24+5:302016-03-16T08:39:24+5:30
मोठ्या वादंगानंतर भारतात दाखल झालेल्या पाकिस्तानचा संघ बुधवारी टी-२० विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामीसाठी झुंजार बांगलादेशविरुद्ध लढेल. मैदानाबाहेरील घडामोडींमुळे
कोलकाता : मोठ्या वादंगानंतर भारतात दाखल झालेल्या पाकिस्तानचा संघ बुधवारी टी-२० विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामीसाठी झुंजार बांगलादेशविरुद्ध लढेल. मैदानाबाहेरील घडामोडींमुळे सध्या खूप चर्चेचा विषय ठरलेल्या पाकिस्तानची कामगिरी प्रत्यक्षात मैदानात कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्याच वेळी बांगलादेश सलामीलाच धक्कादायक निकाल नोंदवण्यात यशस्वी होतो की नाही, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणारे आहे.
ईडन गार्डन येथे होणाऱ्या या सामन्यात पाकिस्तान बांगलादेशविरुद्ध आशिया कपमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या निर्धाराने खेळेल. तर, पाकिस्तानविरुद्ध जिंकल्याचा आत्मविश्वास घेऊन बांगलादेश पुन्हा एकदा धक्का देण्यास सज्ज आहे.
टी-२० पात्रता फेरीत चमकदार कामगिरी करून मुख्य स्पर्धेत प्रवेश घेतलेल्या बांगलदेशचा संघ चांगल्या लयीमध्ये आहे. सलामीवीर तमीम इक्बालने अखेरच्या पात्रता लढतीत ओमानविरुद्ध शतक तडकावले असल्याने त्याच्यावरच संघाची मुख्य मदार असेल. अष्टपैलू शाकिब अल हसनचा अनुभवही बांगलादेशसाठी निर्णायक ठरेल. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा शाकिब ईडन गार्डनची खेळपट्टी चांगली ओळखून असल्याने त्याचा फायदा तो बांगलादेशला नक्कीच करून देईल.
दुसरीकडे पाकिस्तानने सर्व वाद बाजूला ठेवून क्रिकेटकडे लक्ष केंद्रित केले आहे. फिक्सिंगच्या आरोपानंतर जबरदस्त पुनरागमन केलेल्या मोहम्मद आमीरमुळे पाकिस्तानची गोलंदाजी अधिक मजबूत आहे. मोहम्मद इरफान व वहाब रियाज यांचा मारा बांगलादेशसाठी डोकेदुखी ठरू शकतो. (वृत्तसंस्था)
बांगलादेश : मशरदी मुर्तझा (कर्णधार), अराफत सनी, महमुदुल्लाह, सौम्य सरकार, मुशफिकुर रहीम, शब्बीर रहमान, अबु हैदर, नुरुल हसन, अल अमीन हुसैन, नासिर हुसैन, शाकिब अल हसन, तमीम इक्बाल, तस्कीन अहमद, मोहम्मद मिथून आणि मुस्तफिझूर रहमान.
पाकिस्तान : शाहीद आफ्रिदी (कर्णधार), मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, मोहम्मद इरफान, शारजील खान, वहाब रियाज, मोहम्मद नवाज, मोहम्मद सामी, खालिद लतीफ, मोहम्मद आमीर, उमर अकमल, सरफराज अहमद, इमाद वसीम, अन्वर अली आणि खुर्रम मंजूर.
हेड टू हेड
पाकिस्तान-बांग्लादेश संघांदरम्यान आत्तापर्यंत ९ लढती झाल्या आहेत. ७ पाकिस्तानने व २ बांग्लादेशने जिंकल्या आहेत.
सामन्याची वेळ
सायंकाळी ३.०० पासून
स्थळ :
ईडन गार्डन, कोलकाता