फखर जमानला नशिबाची साथ, झळकावलं खणखणीत शतक
By Admin | Published: June 18, 2017 05:40 PM2017-06-18T17:40:02+5:302017-06-18T18:58:36+5:30
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महामुकाबल्यामध्ये पाकिस्तानचा नवखा सलामीवीर फखर जमान याने शानदार शतक झळकावलं.
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 18 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महामुकाबल्यामध्ये पाकिस्तानचा नवखा सलामीवीर फखर जमान याने शानदार शतक झळकावलं. अवघ्या 106 चेंडूंमध्ये 114 धावा करत त्याने भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. त्याच्या या खेळीच्या बळावर पाकिस्तान सुस्थितीत पोहोचला असून शेवटचं वृत्त येईपर्यंत पाकिस्तानच्या 37 षटकात 2 गडी बाद 227 धावा झाल्या आहेत.
114 धावांच्या या शानदार खेळीदरम्यान फखर जमानला नशिबाचीही जोरदार साथ मिळाली. भारताकडून जसप्रित बुमराहने टाकलेल्या चौथ्या षटकाच्या दुस-याच चेंडूवर पाकिस्तानला पहिला धक्का बसला होता. बुमराहच्या या ओव्हरमध्ये फखर जमान हा धोनीकडे झेल देऊन बाद झाला होता. त्यावेळी तो केवळ 3 धावांवर खेळत होता. पण त्याला नशिबाची साथ मिळाली कारण बुमराहचा हा बॉल रिप्ले बघितल्यानंतर नो-बॉल देण्यात आला. त्यानंतरही फखर जमानला धावचीत करण्याची संधी भारतीय क्षेत्ररक्षकांना होती पण त्यांंचं क्षेत्ररक्षण लौकिकास साजेसं झालं नाही.
फखार झमान याने दुसरा सलामीवीर अझहर अली याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी तब्बल 128 धावांची भागीदारी करत भारतीय आक्रमणामधली हवाच काढून टाकली. त्याच्या या खेळीच्या बळावर पाकिस्तानकडे भारतासमोर मोठं आव्हान देण्याची संधी आहे.