अधिवेशन काळात उपोषणाला बसणार
By admin | Published: February 23, 2017 01:01 AM2017-02-23T01:01:45+5:302017-02-23T01:01:45+5:30
केरळ येथे जानेवारी २०१५मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंच्या रोख रकमेची पारितोषिके
पुणे : केरळ येथे जानेवारी २०१५मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंच्या रोख रकमेची पारितोषिके शासनाकडून अनेक वेळा अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून आणि पत्रव्यवहार करून मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. पारितोषिकांच्या रकमेसाठी कठोर पावले उचलली पाहिजेत. मुंबईत उपोषणाला बसण्यासंदर्भाची अशी चर्चा कार्यकारिणीच्या बैठकीत झाली असल्याची माहिती महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी दिली. या वेळी एमओएच्या निवडणुकीची तारीख २५ मार्च निश्चित करण्यात आली.
महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेची बैठक निसर्ग मंगल कार्यालयात आज (बुधवारी) पार पडली. या वेळी अध्यक्ष अजित पवार, खजिनदार धनंजय भोसले, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रल्हाद सावंत, प्रकाश तुळपुळे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. केरळ राष्ट्रीय स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंच्या पारितोषिकांच्या रकमेचा विषय पुढे आल्यावर त्यावर चर्चा होऊन खेळाडूंनी तरी त्यांच्या हक्काच्या पारितोषिकांसाठी किती महिने वाट पाहायची? तो त्यांचा हक्क आहे. आपले राज्य पदकविजेत्यांना इतर राज्यांपेक्षा कमी रक्कम देते आणि तीसुद्धा वेळेवर मिळत नाही, अशी तक्रार काही सदस्यांनी अध्यक्षांकडे केली. तेव्हा अध्यक्ष म्हणाले, ‘‘आपल्या राज्यात अनेक गुणवान खेळाडू आहेत. खरे तर आपण क्रीडामंत्र्यांबरोबरसुद्धा या संदर्भात अनेक वेळा चर्चा केली आहे. क्रीडा खात्यातील अधिकाऱ्यांबरोबरसुद्धा बोलणे झाले आहे. एवढे होऊनही जर रक्कम मिळत नसेल, तर खेळाडूंच्या हक्कासाठी आपण सर्व मिळून पुढील महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान उपोषणाला बसू.’’ निवडणुकीसंदर्भात लांडगे म्हणाले, ‘‘दर ४ वर्षांनंतर
होणाऱ्या निवडणुकीसाठी २५ मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली. (क्रीडा प्रतिनिधी)