विजेतेपद राखण्यात अपयशी ठरलो - अनुप कुमार
By admin | Published: March 7, 2016 03:52 AM2016-03-07T03:52:32+5:302016-03-07T03:52:32+5:30
‘हरल्यानंतर काय बोलणार, आमच्याकडून मोक्याच्या वेळी चुका झाल्या. पटना पायरेट्सच्या खेळीचे श्रेय दिले पाहिजे, ते खरंच चांगले खेळले. आम्ही विजेतेपद राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलो
रोहित नाईक, मुंबई
‘हरल्यानंतर काय बोलणार, आमच्याकडून मोक्याच्या वेळी चुका झाल्या. पटना पायरेट्सच्या खेळीचे श्रेय दिले पाहिजे, ते खरंच चांगले खेळले. आम्ही विजेतेपद राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलो,’ या प्रतिक्रियेतूनच यू मुंबाचा कर्णधार अनुप कुमारची निराशा स्पष्ट दिसून येते. प्रो कबड्डीच्या तिसऱ्या मोसमात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्यानंतर अनुपने ‘लोकमत’शी बोलताना आपले मत मांडले.
‘अखेरच्या चढाईत माझे नियंत्रण चुकल्याने मी बाद झालो आणि पटनाने एका गुणाची निर्णायक आघाडी घेत बाजी मारली. हाच सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरला. जर त्या वेळी मी बाद झालो नसतो, तर चित्र नक्की वेगळे दिसले असते,’ असेही अनुपने या वेळी सांगितले.
भक्कम बचावासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईकरांची बचाव फळी अंतिम सामन्यात मात्र अपयशी ठरली. पहिली यशस्वी पकड करण्यासाठी यू मुंबाला तब्बल १५व्या मिनिटांपर्यंत वाट पहावी लागली. याबाबत अनुप म्हणाला, ‘काही वेळा नशीब तुम्हाला साथ देत नाही. नेमकी हीच गोष्ट आमच्यासोबत घडली. जेवढ्या पकडी करण्याचा आम्ही प्रयत्न केला, त्या सगळ्या अपयशी ठरल्या. सलग पकडी अपयशी ठरल्या, तर दडपण येतं. त्यामुळेच सुरुवातीला खेळ खालावल्याने सावरायला वेळ लागला. चढाईपटूही बाद होत असल्याने सर्वच आमच्या विरोधात घडत होते. मध्यंतराला आम्ही योग्य नियोजन केल्याने खेळ हळूहळू सुधारला. बरोबरीही साधली, पण शेवटी अपयशी ठरलो.’
संपूर्ण स्पर्धेत निर्णायक ठरलेल्या रिशांक देवाडिगाला या सामन्यात सुरुवातीच्या काही चढाईनंतर बाहेर बसवून शब्बीर बापूला खेळविण्यात आले. याबाबत अनुपने सांगितले, ‘रिशांक सुरुवातीला खूप वेळा बाद झाला. डावी बाजू थोडी कमजोर असल्याने, आम्ही त्याला बाहेर बसवून शब्बीरला खेळविण्याचा प्रयोग केला, पण फारसा फरक नाही पडला, तसेच आता यापुढे प्लॅनिंग तर आहेच. मात्र, त्यासाठी खूप वेळ बाकी आहे, पण आता येणाऱ्या मोसमाच्या सुरुवातीलास सर्व प्लॅनिंग सुरू होतील.’