प्रगतीतून अधोगतीकडे
By admin | Published: December 29, 2014 04:28 AM2014-12-29T04:28:47+5:302014-12-29T04:28:47+5:30
विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांनी वैयक्तिक शतके झळकावीत मेलबोर्न क्रि केट मैदानावर चौथ्या विकेटसाठी नोंदविलेल्या २६२ धावांच्या विक्रमी भागीदारीनंतर
मेलबोर्न : विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांनी वैयक्तिक शतके झळकावीत मेलबोर्न क्रिकेट मैदानावर चौथ्या विकेटसाठी नोंदविलेल्या २६२ धावांच्या विक्रमी भागीदारीनंतर अखेरच्या सत्रात ३ बाद ४0९ वरुन ८ बाद ४६२ अशी घसरगुंडी उडाली. यामुळे भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात प्रगतीतून अधोगतीकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. या सत्रात लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी आणि अश्विन यांनी हाराकिरी केली. भारताला आॅस्ट्रेलियाची पहिल्या डावातील धावसंख्या (५३०) गाठण्यासाठी अद्याप ६८ धावांची गरज आहे.
काल, शनिवारच्या १ बाद १०८ धावसंख्येवरून पुढे खेळताना मुरली विजय (६८) व चेतेश्वर पुजारा (२५) झटपट बाद झाले. त्यानंतर कोहली (१६९) व रहाणे (१४७) यांनी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करीत भारताचा डाव सावरला. भारताने तिसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ८ बाद ४६२ धावांची मजल मारली.
कोहली व रहाणे यांनी एमसीजीवर पाहुण्या संघातर्फे चौथ्या विकेटसाठी सर्वांत मोठ्या भागीदारीचा विक्रम नोंदविला. ही भागीदारी संपुष्टात आल्यानंतर मात्र भारताची घसरगुंडी उडाली. भारताने ११२ चेंडूंमध्ये ५३ धावांच्या मोबदल्यात पाच विकेट गमाविल्या. कोहली दिवसाच्या अखेरच्या षटकात मिशेल जॉन्सनच्या (१-१३३) गोलंदाजीवर बाद झाला. तिसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान कोहलीचा जॉन्सनसोबत वाद झाला होता. कोहलीने कारकिर्दीतील नववे, तर मालिकेतील तिसरे शतक झळकाविले. कोहलीने २७२ चेंडूंना सामोरे जाताना १८ चौकारांच्या साह्याने १६९ धावांची खेळी केली.
रहाणेला नॅथन लियोनने (२-१०८) तंबूचा मार्ग दाखविल्यानंतर भारताच्या घसरगुंडीला सुरुवात झाली. रहाणेने १७१ चेंडूंना सामोरे जाताना २१ चौकारांच्या साह्याने १४७ धावा फटकाविल्या. रहाणेने आज, रविवारी ८५.९६ च्या स्ट्राईक रेटने धावा फटकाविल्या. रहाणेचे कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे. पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या लोकेश राहुलला (३) मोठी खेळी करता आली नाही. लियोनच्या गोलंदाजीवर सुदैवी ठरलेल्या राहुल लोकेशने पुढच्याच चेंडूवर फाईन लेगला तैनात जोश हेजलवूडला झेल दिला.
त्यानतंर आॅस्ट्रेलियाचा सर्वांत यशस्वी गोलंदाज रॅन हॅरिसने (४-६९) कर्णधार महेंद्रसिंग धोनी (११) व रवीचंद्रन अश्विन (०) यांना झटपट माघारी परतविले. (वृत्तसंस्था)
दरम्यान, शतकाच्या उंबरठ्यावर असताना कोहलीचा जॉन्सनसोबत वाद झाला होता. त्यानंतर लगेच जॉन्सनच्या गोलंदाजीवर विराटचा उडालेला झेल स्लिपमध्ये तैनात वॉटसनला टिपण्यात अपयश आले. त्यावेळी विराट ८८ धावांवर होता. (वृत्तसंस्था)