कुटुंंबात डॉक्टर, इंजिनिअर, ही मात्र बॉक्सर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 03:46 AM2017-11-22T03:46:26+5:302017-11-22T03:46:36+5:30
‘मोठ्या दोन्ही बहिणी इंजिनिअर... थोरला भाऊ डॉक्टर... वडील सीमा सुरक्षा दलात अधिकारी... काकांची मुलेदेखील उच्चशिक्षित... कुटुंबात कुणी खेळाडू नव्हते.
-किशोर बागडे
‘मोठ्या दोन्ही बहिणी इंजिनिअर... थोरला भाऊ डॉक्टर... वडील सीमा सुरक्षा दलात अधिकारी... काकांची मुलेदेखील उच्चशिक्षित... कुटुंबात कुणी खेळाडू नव्हते. खेळाची पार्श्वभूमी नाही... पण मी बॉक्सर बनले... वडिलांच्या प्रोत्साहनामुळे देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.’ वंडरगर्ल शशी चोप्रा अभिमानाने सांगत होती. या खेळातील तिची कामगिरी नवोदित खेळाडूंसाठी पे्ररणादायी ठरावी, अशी आहे.
विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेत तिसºया दिवशी मंगळवारी फिदरवेट प्रकारात (५७ किलो) उपांत्यपूर्व फेरीत धडक देणाºया हरियाणातील हिस्सारची रहिवाशी असलेल्या शशीने ‘लोकमत’शी संवाद साधताना खेळातील हा प्रवास उलगडला.
ती म्हणाली, ‘२०१० मध्ये नवी दिल्ली राष्टÑकुल स्पर्धेसाठी वडील मला घेऊन गेले. दिल्लीत मी सायनाचा बॅडमिंटन सामना पाहिला. तेव्हाच मनोमन खेळाडू बनण्याचा विचार केला. सायना आमच्या हिस्सारची. सायनाचे कौतुक होताना पाहून आपणही काही करावे असे वाटायचे. सुरुवातीला कुुस्ती खेळले. फिटनेस मिळवत असताना मेरी कोमच्या खेळापासून बॉक्सिंग करण्याची प्रेरणा लाभली. तेव्हापासून पाच वर्षांतील मिळकत सर्वांपुढे आहे. मला शारीरिक उंची लाभल्याने या खेळात लाभ होतोच; पण कोचिंगमधील टिप्स सामन्याच्या वेळी कशा कृतीत आणतो यावर यश अवलंबून असते. मी आक्रमक आहे तरीही सुरुवातीला स्वत:ची ताकद खर्ची घालत नाही. प्रतिस्पर्धी खेळाडूला थकू द्या आणि वार करा, हे बॉक्सिंगमधील माझ्या यशाचे गमक आहे.’
शशीची मोठी बहीण इंजिनीयर बनून बीएसएफमध्ये रुजू झाली. दुसरी बहीण इंजिनीयर असून गुडगाव येथे आयटी कंपनीत आहे. भाऊ फरिदाबाद येथे डॉक्टर आहे. १८ वर्षांची शशी लहान असल्याने कुटुंबात सर्वांची लाडकी. आईपासून दूर असली तरी खेळात तितकीच कठोर. बीएच्या द्वितीय वर्षाला शिकणाºया या मुलीने यंदा जानेवारीत झालेल्या अ. भा. आंतर विद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदकासह ‘सर्वोत्कृष्ट बॉक्सर’चा पुरस्कार जिंकला. इस्तंबूल आणि सोफियात झालेल्या आंतरराष्टÑीय स्पर्धेत दोन महिन्यांत देशाला दोन पदके जिंकून दिली. शांत स्वभावाच्या शशीला हिंदी गीते पसंत आहेत. संगीत ऐकले की शरीर बॉक्सिंगसाठी सज्ज होते, असे शशीचे मत आहे. विश्व यूथ बॉक्सिंगमधील पदक मला देशाच्या सिनियर
संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देईल. पुढे राष्टÑकुल आणि टोकियो आॅलिम्पिकसाठी स्थान मिळविता येईल, असा विश्वासही तिने व्यक्त केला.
>शशीची बॉक्सिंगमधील कामगिरी...
आंतरराष्टÑीय यूथ बॉक्सिंग स्पर्धा, इस्तंबूल तुर्कस्थान येथे रौप्यपदक
तिसºया आंतरराष्टÑीय बॉक्सिंग स्पर्धा, सोफिया बल्गेरिया येथे सुवर्णपदक
अ. भा. आंतर विद्यापीठ महिला बॉक्सिंग स्पर्धा, जालंधर येथे
सुवर्णपदक व ‘सर्वोत्कृष्ट बॉक्सर’ म्हणून सन्मानित
यूथ महिला राष्टÑीय चॅम्पियनशिप नवी दिल्ली येथे कांस्यपदक.