चाहत्यांनो! तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे केवळ गोल्डमेडल आहे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 05:51 AM2018-11-25T05:51:58+5:302018-11-25T05:52:21+5:30
‘सुपरमॉम’ सहाव्यांदा विश्वचॅम्पियन; फायनलमध्ये युक्रेनच्या हानाला नमवले
नवी दिल्ली : मेरी कोमचे करिअर संपले... अशी चर्चा काही वर्षांपूर्वी सुरू झाली होती. त्याच सुपरमॉमने पुन्हा एकदा सर्वांना ऐतिहासिक विक्रमाचा धक्का दिला. युक्रेनच्या खेळाडूला ५-० ने पराभूत करून मेरी कोम या स्टार बॉक्सरने विश्व महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सहाव्यांदा जगज्जेतेपदावर नाव कोरले.
इतिहास रचल्यानंतर तिरंगा हाती पकडताच तिच्या डोळ््यांत सुवर्णाश्रु तरळले. ती म्हणाली, चाहत्यांनो थॅक्स. तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे केवळ गोल्डमेडल आहे. हे मेडल माझ्या देशवासीयांना.. देशाला मी समर्पित करते.
४८ किलो वजनी गटातही तिला खेळणे मुश्कील झाले होते. तीच सुपरमॉम ५१ किलो वजनी गटात विश्वविक्रम करणारी बॉक्सर ठरली. येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या फायनलमध्ये मेरीकोमने शनिवारी युक्रेनची युवा बॉक्सर हाना ओखोटोचा ५-० असा पराभव करत सहाव्या विजेतेपदावर स्वत:चे नाव कोरले.
केटी टेलरचा विक्रम मोडीत
मेरीने ४८ किलो गटाच्या अंतिम फेरीत पाचवेळा विजेतेपद मिळवले होते. सहाव्यांदा गोेल्ड मिळवून मेरीने आयर्लंडच्या केटी टेलरचा पाच जेतेपदांचा विक्रम मोडीत काढला.