फराहची ‘सुवर्ण’धाव

By admin | Published: August 23, 2015 02:52 AM2015-08-23T02:52:37+5:302015-08-23T02:52:37+5:30

जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टने आपला दबदबा असलेल्या १०० मी शर्यतीमध्ये अपेक्षित कामगिरी करताना जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला

Farahchi 'gold' | फराहची ‘सुवर्ण’धाव

फराहची ‘सुवर्ण’धाव

Next

बीजिंग : जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टने आपला दबदबा असलेल्या १०० मी शर्यतीमध्ये अपेक्षित कामगिरी करताना जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी असाफा पॉवेल आणि निकेल अश्मीएड या जमैकाच्या अन्य धावपटूंनी देखील उपांत्य फेरीत धडक मारली आहे. विशेष म्हणजे बोल्टचा कट्टर प्रतिस्पर्धी मानला जाणारा अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीनने बोल्टपेक्षा चांगली वेळ नोंदवून उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचवेळी ब्रिटनच्या मोहम्मद फराह याने १० हजार मीटर अंतराच्या पुरुषांच्या शर्यतीत सुवर्ण पदकावर नाव कोरले.
स्पर्धेतील सर्वांची उत्सुकता लागलेल्या १०० मीटर शर्यतीमध्ये संभाव्य विजेत्या उसेन बोल्टने हीट ७ गटातून उपांत्य फेरी गाठताना ९.९६ सेकंदाची वेळ नोंदवली. याच गटात अमेरीकेच्या माइक रॉजर्स (९.९७) आणि नेदरलँडच्या चुरंडी मार्टिना (१०.०६) यांनी देखील अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून उपांत्य फेरी गाठली. बोल्टचा जवळचा प्रतिस्पर्धी जस्टीन गॅटलीनने हीट ६ मधून सहभागी होताना ९.८३ सेकंदाची जबरदस्त वेळ नोंदवून बोल्टला धोक्याचा इशारा दिला आहे. त्याचवेळी टायसन गे या अमेरीकेच्या अन्य कसलेल्या खेळाडूने देखील उपांत्य फेरी गाठली असली तरी त्याने हीट २ गटामध्ये १०.११ अशी निराशाजनक वेळ नोंदवली. जमैकाच्याच असाफा पॉवेलने हीट १ मध्ये वर्चस्व राखताना ९.९५ अशी वेळ नोंदवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
दुसऱ्या बाजूला अत्यंत अटीतटीच्या झालेल्या पुरुषांच्या १० हजार मीटर शर्यतीमध्ये ब्रिटनच्या मोहम्मद फराह याने अंतिम क्षणी वेग वाढवताना केनियाच्या जेफ्री कामवोरोरला मागे टाकण्याची किमया केली. अखेरपर्यंत चुरशीच्या झालेल्या या शर्यतीमध्ये जेफ्रीने फराहला गाठलेच होते. मात्र अंतिम क्षणी बाजी मारताना फराहने २७:०१:१३ अशी वेळ नोंदवून जेतेपद पटकाविले. जेफ्रीला २७:०१:७६ अशा वेळेसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. त्याचवेळी केनियाच्याच पॉल तानुई आणि बेदान मुचिरी यांनी अनुक्रमे २७:०२:८३ व २७:०४:७७ अशा वेळेसह तृतीय व चौथ्या क्रमांकावर कब्जा केला.

फराहने रचला इतिहास
विश्व अजिंक्यपद स्पर्धेत दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सलग सहाव्यांदा अजिंक्य राहण्याची किमया फराह याने केली आहे.
त्याने २७ मिनिटे १.१३ सेकंदांत हे अंतर पार करीत पाल तानुई (२७ मिनिटे २.८३ सेकंद) याला मागे टाकत किताब पटकावला. इथिओपियाच्या केनेनिसा बेकेले,
हेले ग्रेबेस्लासी यासारख्या
दिग्गजांना मागे टाकत फरहाने ही कामगिरी केली.

Web Title: Farahchi 'gold'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.