फराहची ऐतिहासिक सुवर्ण कमाई
By admin | Published: August 22, 2016 04:47 AM2016-08-22T04:47:22+5:302016-08-22T04:47:22+5:30
ब्रिटनच्या मोहम्मद फराहने १० व ५ हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावताना आॅलिम्पिकमध्ये नवा इतिहास घडवला.
रिओ : ब्रिटनच्या मोहम्मद फराहने १० व ५ हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावताना आॅलिम्पिकमध्ये नवा इतिहास घडवला. आॅलिम्पिकच्या इतिहासात ४० वर्षांनंतर अशा कामगिरीची पुनरावृत्ती झाली.
आॅलम्पिकच्या मैदानी स्पर्धेच्या इतिहासात लांब पल्ल्याच्या धावपटूंमध्ये ५ व १० हजार मीटर शार्यतीत जेतेपद राखणारा तो दुसरा धावपटू ठरला. त्याने लंडन आॅलिम्पिकमध्ये दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. आता रिओमध्येही त्याने त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करीत इतिहास घडवला. आठवड्याभरापूर्वी ब्रिटनच्या खेळाडूने रिओमध्ये १० हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले होते. या कामगिरीसह फराहने फिनलँडच्या लासे वीरेनच्या कामगिरीची बरोबरी केली. वीरेनने १९७२ व १९७६ च्या आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये दोन्ही शर्यतीत सुवर्णपदके पटकावली होती. ३३ वर्षीय फराहने विश्व अजिंक्यपदमध्ये ५ व १० हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदके पटकावली आहे. यासह फराहचे नाव सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत नोंदवले गेले.