वेगवान गोलंदाज विश्वास सार्थ ठरवित आहेत
By admin | Published: May 1, 2017 01:38 AM2017-05-01T01:38:46+5:302017-05-01T01:38:46+5:30
सुपर ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहचे श्वास रोखून धरायला लावणारे षटक आयपीएल २०१७ च्या संस्मरणीय आठवणींमध्ये स्थान
-रवी शास्त्री -
सुपर ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहचे श्वास रोखून धरायला लावणारे षटक आयपीएल २०१७ च्या संस्मरणीय आठवणींमध्ये स्थान मिळवणारे ठरले. त्याने नो-बॉल व वाईड चेंडू टाकले तरी मॅक्युलम व फिंचच्या बॅटला मात्र फटकेबाजी करता आली नाही. त्याचे जास्तीत जास्त चेंडू यॉर्क र होेते. चेंडू किती वेगाने त्यांच्याकडे येत आहे, याचा अंदाज फलंदाजांना घेता येत नव्हता. दोन अवांतर चेंडू आणि एक फ्री हिट महागडे ठरले नाही. गुजरातचे दोन विशेष फलंदाज केवळ चेंडूचा अंदाज घेत असल्याचे दिसून आले.
यंदाच्या आयपीएलमध्ये राशिद, बद्री व ताहिर यांनी चमकदार कामगिरी करीत छाप सोडल्यानंतर आता वेगवान गोलंदाज लौकिकाला साजेशी कामगिरी करीत असल्याचे दिसून येत आहे. सुनील नरेन व कुलदीप यादव यांची उपस्थिती संघासाठी लाभदायक ठरत असली तरी प्रत्येक संघातील वेगवान गोलंदाजच प्रतिस्पर्धी संघाच्या आघाडीच्या फळीवर वर्चस्व गाजवित आहेत. दिल्लीविरुद्ध मुंबईची आणि बंगळुरुविरुद्ध कोलकाता संघाची कामगिरी बघितल्यानंतर याची प्रचिती येते. फिरकी गोलंदाजी महत्त्वाची आहे, पण प्रतिस्पर्धी संघावर दहशत निर्माण करण्यासाठी वेगवान गोलंदाजी महत्त्वाची ठरते. नॅथन कुल्टर नाईलने कोलकाता संघाला आणखी एक लढत जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ख्रिस मॉरिस फलंदाजांना जास्तीत जास्त पायचित बाद करतो. उमेश यादव त्यांच्या यष्टीला लक्ष्य करतो. मिशेल जॉन्सन व कॅगिसो रबाडा यांना लवकरच सूर गवसेल, अशी आशा आहे. टायने येताच मात्र आपली छाप सोडली. पॅट कमिन्स प्रसिद्धीच्या झोतात न येता आपली भूमिका चोख बजावत आहे. बासिल थंपी व सिद्धार्थ कौल यांचे नाव यापूर्वी विशेष ऐकलेले नव्हते आणि भुवनेश्वरकडे कुणीच डोळेझाक करणार नाही. कुठल्याही फलंदाजासाठी त्याच्या चेंडूचा अंदाज घेणे अडचणीचे ठरत आहे.
यातील जास्तीत जास्त गोलंदाजांचे मुख्य अस्त्र यॉर्कर आहे. हे सर्व चेंडूच्या वेगामध्ये बदल करण्यास माहिर आहेत. क्षेत्ररक्षण कसे सजवायचे, याची त्यांना चांगली माहिती आहे. जवळजवळ सर्वच कर्णधार त्यांच्यासाठी आक्रमक क्षेत्ररक्षण लावतात. कर्णधारांचा त्यांच्यावर विश्वास असून ते हा विश्वास सार्थ ठरवित आहेत. (टीसीएम)