वेगवान गोलंदाजांनी स्थानिक स्पर्धांमध्ये कमी खेळावे - धोनी
By Admin | Published: March 27, 2015 03:53 PM2015-03-27T15:53:20+5:302015-03-27T16:34:22+5:30
उमेश यादव, मोहम्मद शमी व मोहित शर्मा या तिघांनी कमीत कमी स्थानिक स्पर्धांमध्ये खेळले पाहिजे असे मत कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले आहे.
>ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. २७ - वर्ल्डकपमध्ये प्रतिस्पर्धी संघाची भंबेरी उडवणारे वेगवान गोलंदाज उमेश यादव, मोहम्मद शमी व मोहित शर्मा या तिघांनी कमीत कमी स्थानिक स्पर्धांमध्ये खेळले पाहिजे असे मत कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले आहे. यामुळे गोलंदाज कमी थकतील व त्यांच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही असे धोनीचे म्हणणे आहे.
वर्ल्डकपमध्ये उमेश यादव, मोहम्मद शमी व मोहित शर्मा या तिघा गोलंदाजांनी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताने ७० हून अधिक विकेट घेतल्या आहेत. यातील ४८ विकेट या वेगवान गोलंदाजांनी घेतल्या आहेत. यात यादवने १८, शमीने १७ तर मोहित शर्माने १३ विकेट घेतल्या आहेत. वेगवान गोलंदाजांच्य या त्रिकुटाच्या कामगिरीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या गोलंदाजांच्या कामगिरीचे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने भरभरुन कौतुक केले. तसेच त्यांचा फिटनेस कायम राहावा यासाठी बीसीसीआयला काही सुचना दिल्या आहेत. धोनी म्हणतो, या तिघांना बीसीसीआयने स्थानिक स्पर्धांमध्ये जास्त खेळवू नये. तसेच हे तिघे ज्या राज्यातून येतात तेथील क्रिकेट संघटनांनीही रणजी किंवा अन्य स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकू नये. बीसीसीआयने याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. गोलंदाजांवर किती दबाव आहे, तो किती षटकं टाकतो हे आपण बघितले पाहिजे. त्यांना अधून मधून स्थानिक स्पर्धांमध्ये खेळवणे उचित ठरेल असे धोनीने स्पष्ट केले. या गोलंदाजांचा फिटनेस चांगल्या राहिल्यास भविष्यातील विदेश दौ-यांमध्ये ते चांगली कामगिरी करु शकतील असे धोनीने नमूद केले. पण एकीकडे रणजीसारख्या स्थानिक स्पर्धांमध्ये गोलंदाजांना खेळवू नका असे म्हणणारा धोनी आयपीएलमध्येही गोलंदाजांनी खेळू नका असा सल्ला देईल का असा खोचक सवालही क्रिकेटप्रेमी विचारत आहेत.