भारत-पाकिस्तान सामन्याचे भवितव्य अधांतरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2016 03:10 AM2016-03-05T03:10:31+5:302016-03-05T03:10:31+5:30
विश्वचषक टी-२० क्रिकेटसाठी संघ पाठविण्याआधी भारतातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तान सुरक्षा पथक पाठविणार आहे
फुलप्रूफ सुरक्षेची बीसीसीआयची हमी
कराची : पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतात पाक संघाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली असून विश्वचषक टी-२० क्रिकेटसाठी संघ पाठविण्याआधी भारतातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तान सुरक्षा पथक पाठविणार आहे. या पथकाच्या अहवालानंतरच संघ पाठविण्याचा अंतिम निर्णय होणार असल्याने धर्मशाला येथील भारत-पाक लढतीचे भविष्य अधांतरीच आहे.
पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गृहमंत्री चौधरी निसार अली यांना पाकिस्तान संघाला पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी भारतात सुरक्षा पथक पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. सुरक्षेची हमी मिळाल्यानंतरच आम्ही आपला संघ पाठवू शकतो, अशी परिस्थिती आहे. सरकारने आम्हाला विश्वचषक टी-२० मध्ये खेळण्याची आधीच परवानगी दिली आहे पण धर्मशाला येथील भारत-पाक सामन्याच्या आयोजनाबाबत सुरक्षेच्या चिंतेचा अहवाल पंतप्रधानांना सोपविण्यात आला.’
पंतप्रधान सचिवालयाने देखील पाकचा विश्व टी-२० तील सहभाग सुरक्षा दलाच्या अहवालावर आलंबून असल्याचे म्हटले आहे. निसार अली यांनी इस्लामाबाद येथे एका बैठकीदरम्यान संपूर्ण माहिती शरीफ यांना दिली. त्यानंतर पंतप्रधानांनी पाकिस्तानी संघासाठी नवी दिल्लीतील पाक दूतावासामार्फत आयोजकांकडून फुलप्रूफ सुरक्षा मिळणार असल्याची खात्री करून घेण्याचे निर्देश दिले.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान संघाच्या दारुण पराभवानंतर देशात जो जनक्षोभ उसळला त्यावरून पराभवावर अहवालदेखील पंतप्रधान कार्यालयाने मागितला आहे.
नवी दिल्ली : सुरक्षेच्या कारणांवरून स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी मिळताच बीसीसीआयने टी-२० विश्वचषकादरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाला फुलप्रूफ सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. पीसीबी प्रमुख शहरयारखान यांनी बीसीसीआयकडे लेखी आश्वासन मागितले होते. यावर बीसीसीआयने फुलप्रूफ सुरक्षा पुरविण्यास आम्ही वचनबद्ध आहोत पण आता चेंडू पीसीबीच्या कोर्टात असल्याचे राजीव शुक्ला यांनी सांगितले.
८ मार्चपासून सुरू होत असलेल्या विश्वचषकाआधीच भारत-पाक लढतीवरून राजकारण सुरू झाले आहे. यावर शुक्ला म्हणाले, ‘बीसीसीआय’च्यावतीने पाक संघाला फुलप्रूफ सुरक्षा पुरविली जाईल. सुरक्षेची चिंता बाळगण्याचे कारण नाही. त्यांना भारतात खेळायचे आहे किंवा नाही, हे त्यांनीच ठरवावे. पाक संघ आयसीसीप्रती जबाबदार आहे. पाकने खेळायचे किंवा नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण स्पर्धा आमच्या देशात असल्याने बीसीसीआय त्यांच्या सुरक्षेची हमी देईल.’
पीसीबीने भारत सरकारकडे लेखी हमी देण्याचा आग्रह धरला आहे. याविषयी मत जाणून घेतले असता शुक्ला म्हणाले, ‘आम्ही सरकारला हे सांगू शकत नाही.’ १९ मार्च रोजी धर्मशाला येथे होणाऱ्या भारत-पाक सामन्यावर देखील अनिश्चिततेचे ढग आहेत. पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिमाचलमधील माजी सैनिकांनी सामना आयोजनास तीव्र विरोध दर्शविला.
बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी मात्र माझी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी माजी सैनिकांची समजूत काढण्याचे तसेच संपूर्ण सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले असल्याचे काल म्हटले होते.
ठिकाण बदलणे अशक्य
राजीव शुक्ला म्हणाले, मी सुद्धा हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी आवश्यक सर्व उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.’ सैनिकांनी दर्शविलेल्या विरोधाबाबत विचारताच शुक्ला म्हणाले, ‘आम्ही देखील सैनिकांसोबत आहोत. याच कारणास्तव पाकसोबत द्विपक्षीय चर्चा थांबविली आहे. पण हा विश्वचषक आहे. सामन्याचे स्थळ बदलणे शक्य नसल्याने आयोजक म्हणून अडचणीत आलो आहोत.’
अर्धसैनिक दलाचे सुरक्षा कवच : गृहमंत्री
भारत-पाकिस्तान यांच्यात १९ मार्च रोजी धर्मशाला येथे होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात अर्धसैनिक दल तैनात करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी दिले आहे. सुरक्षेच्या मुद्यावरून या सामन्याच्या आयोजनावर अनिश्चिततेचे सावट कायम आहे. पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री म्हणाले, ‘हिमाचल प्रदेश सरकारला सुरक्षा हवी असेल तर आम्ही अर्धसैनिक दल पुरवू.’