पिता-पुत्राची धमाल!
By Admin | Published: March 14, 2017 12:50 AM2017-03-14T00:50:58+5:302017-03-14T00:50:58+5:30
वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल अनेकांच्या स्मरणात असेलच. हा फलंदाज अजूनही क्रिकेटच्या मैदानावर सक्रिय आहे.
जमैका : वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल अनेकांच्या स्मरणात असेलच. हा फलंदाज अजूनही क्रिकेटच्या मैदानावर सक्रिय आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या शिवनारायणने रविवारी (दि.१२) त्याच्या मुलासोबत धमाल कामगिरी केली. या दोघांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकाविले. या अर्धशतकीय धडाक्यामुळे चंद्रपॉल आणि त्याचा मुलगा तेगनारायण चर्चेत आले आहेत.
चारदिवसीय स्पर्धेत जमैकाविरुद्ध गयानाकडून खेळताना चंद्रपॉल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याच्या मुलाने संघाची सुरुवात केली होती. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी १२.२ षटकांत ३८ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या योगदानामुळे गयानाने पहिल्या डावात २६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात, जमैकाचा डाव २५५ धावांवर आटोपला. चंद्रपॉल सध्या ४२ वर्षांचा असून तो राष्ट्रीय संघाबाहेर आहे. त्याच्यात आणि मुलात २१ वर्षांचे अंतर आहे.
चंद्रपॉलने १९९४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली होती. १९९६ मध्ये त्याचा मुलगा तेगनारायण याचा जन्म झाला होता. आता दोघेही सोबतच खेळतात. या सामन्यापूर्वी सुद्धा त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत. २०१२ मध्ये गांधी युथ संस्थेकडून खेळताना पिता-पुत्रांनी २५६ धावांची भागीदारी केली होती. तेव्हाही या दोघांची चर्चा रंगली होती. पिता-पुत्रात बरेच साम्य आहे.
चंद्रपॉलप्रमाणेच त्याचा मुलगाही डावखुरा फलंदाज आहे. पीचवर गार्ड घेण्यासाठी सुद्धा तो चंद्रपॉलप्रमाणेच बेलला जमिनीवर ठोकून निशाणी तयार करतो. (वृत्तसंस्था)