‘फेड’ पराभूत, ‘जोको’ फायनलमध्ये
By Admin | Published: January 29, 2016 03:33 AM2016-01-29T03:33:33+5:302016-01-29T03:33:33+5:30
जागतिक क्रमवारीत क्रमांक एकचा खेळाडू नोवाक जोकोवीचने आपला प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर याला आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये चार सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात हरविले.
मेलबोर्न : जागतिक क्रमवारीत क्रमांक एकचा खेळाडू नोवाक जोकोवीचने आपला प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर याला आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये चार सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात हरविले. महिला एकेरीच्या गटात अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने पोलंडच्या एग्निएस्का रंदावास्का हिला हरवून २६व्या वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेची फेरी गाठली आहे.
स्पर्धेच्या लक्षवेधी लढतींपैकी असलेल्या पुरुष एकेरीच्या सेमीफायनलमध्ये सर्बियाचा जोकोवीच आणि तृतीय मानांकित फेडररला ६-१, ६-२, ३-६, ६-३ असे हरवून १८ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे त्याचे स्वप्न धुळीस मिळविले. जोकोवीचची नजर आता आठव्या आॅस्ट्रेलियन ओपनच्या किताबावर आहे. २ तास १९ मिनिटे चाललेल्या सामन्यात जोकोवीचने १० एस लगावले. महिला गटातील एकेरीच्या सेमीफायनलमध्ये सेरेना विल्यम्सने रंदावास्का हिला हरवून सातव्यांदा आॅस्ट्रेलियन ओपन जिंकण्याच्या दृष्टीने अंतिम फेरीत प्रवेश केला. तिने केवळ ६४ मिनिटांत ६-०, ६-४ असा सामना जिंकून सेमीफायनलच्या सामन्यात सुरुवातीपासून दबदबा निर्माण केला होता. पहिल्या १७ मिनिटांतच तिने पहिल्या सेटमध्ये ५-० अशी आघाडी घेतली होती. सेरेनाने २० मिनिटांतच पहिला सेट जिंकला. हा स्पर्धेतील सर्वांत वेगवान जिंकलेला सेट होता. आता सेरेनाचा सामना जर्मनीच्या सातव्या मानांकित एंजेलिक करबेर हिच्याशी होईल.
करबेरने ब्रिटनच्या जोहाना कोंथाला हरविले होते. सेरेनाने आतापर्यंत २६ वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्यांपैकी तिने २१ वेळा स्पर्धा जिंकली आहे.
सेरेना आॅस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल कधीच हरलेली नाही. २००८नंतर तिचे रंदावास्काबरोबर ८ सामने झाले असून, ते सगळे तिने जिंकले आहेत.