फेडरेशन चषक कॅरम : एअर इंडियाच्या संदीप दिवेला दुहेरी मुकूट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 11:23 AM2019-04-01T11:23:18+5:302019-04-01T11:23:49+5:30
उत्तर प्रदेश येथे २५ व्या अखिल भारतीय फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेचे आयोजन.
वाराणसी: २५ व्या अखिल भारतीय फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेत एअर इंडियाच्या संदीप दिवेने कमाल केली बिगरमंकित दिवेने आपल्या आक्रमक खेळाने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी बिगरमानांकीत जैन इरिगेशनच्या अनिल मुंढेला २४-१२, २५-१० असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून विजेतेपद पटकाविले. तर पुरुष दुहेरीमध्येही संदीपने रियाझ अकबर अलीच्या साथीने रिझर्व्ह बँकेच्या झहीर पाशा व रवी वाघमारे जोडीला २५-७, २५-६ असा पराभव केला. या विजयामुळे संदीपला दुहेरी मुकुट मिळाला. संदीपचे राष्ट्रीय स्तरावरील हे पहिलेच विजतेपद आहे. एअर इंडियाने काँट्रॅक्टवर घेतल्यावर पहिल्याच वर्षी केलेल्या या कामगिरीमुळे संदीपचे सर्व स्तरावर विशेष कौतुक होत आहे. या विजयाबरोबरच संदीपने राष्ट्रीय स्तरावर ५ वे स्थान प्राप्त केले आहे.
पुरुष एकेरीच्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीमध्ये विश्व् विजेत्या प्रशांत मोरे ( रिझर्व बँक स्पोर्ट्स बोर्ड ) ने फहिम काझी ( महाराष्ट्र ) याचा २५-१७,२५-१५ असा पराभव करत तिसरा क्रमांक पटकाविला. तर पुरुष दुहेरीत झालेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत उत्तर प्रदेशच्या रिझवान चमन व महम्मद आरिफ जोडीने बिहारच्या जलज कुमार व नवीन कुमार जोडीवर २५-१२, २५-१५ असे सरळ दोन सेटमध्ये मात केली.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाच्या नागज्योथीने आपल्याच सहकारी माजी विश्व् विजेत्या पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाच्या रश्मी कुमारीचा २५-०, १३-३ असा सहज फडशा पाडून विजेतेपद व सर्वांची वाहवा मिळविली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या महिलांच्या लढतीत जैन इरिगेशनच्या ऐशा साजिद खोकावलाने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या एस. अपूर्वावर पहिला सेट ४-२५ असा गमाविल्यानंतरही दुसरा व तिसरा सेट २५-१४, २५-१५ असा जिंकला.
महिला दुहेरीच्या लढतीत जैन इरिगेशनच्या ऐशा साजिद खोकावलाने नीलम घोडकेच्या साथीने पेट्रोलियम सपोर्ट्स प्रमोशन बोर्डाच्या रश्मी कुमारी व आय. इलवझकी जोडीला अटीतटीच्या लढतीत २३-२४, २२-१०, २२-१० असे पराभूत करून विजेतेपद मिळविले. तर महिला दुहेरीच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाच्या नागज्योथी व पी. जयश्री जोडीने तामिळनाडूच्या एस. रोशनीश्री व पी. शवशीनी जोडीवर २२-८, २५-८ असा सहज विजय मिळविला.