फेडरर उपांत्यपूर्व फेरीत पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 03:42 AM2019-09-05T03:42:22+5:302019-09-05T03:43:03+5:30
यूएस ओपन : बिगर मानांकित बल्गेरियाचा ग्रिगोर दिमित्रोव्हने केला पराभव
न्यूयॉर्क : यूएस ओपन टेनिस स्पर्धेत स्वित्झर्लंडचा दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर याला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. बल्गेरियाचा बिगरमानांकित ग्रिगोर दिमित्रोव्ह याने तिसरा मानांकित फेडररला तीन तास १२ मिनिटांच्या संघर्षात ३-६, ६-४, ३-६, ६-४, ६-२ असे पराभूत केले. जागतिक क्रमवारीत ७८ व्या स्थानी असलेल्या बल्गेरियाच्या दिमित्रोव्हने याआधी फेडररशी झालेले सातही सामने गमावले होते. त्यामुळे या सामन्यातही फेडरर त्याला मात देईल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. अपेक्षेप्रमाणे सामना सुरू झाला आणि पहिला सेट फेडररने २९ मिनिटात ३-६ असा सहज जिंकला. त्यानंतर दुसरा सेट दिमित्रोव्हने ६-४ असा जिंकला. तिसरा सेट पुन्हा फेडररने ३-६ ने जिंकला. पण त्यानंतरचे दोन्ही सेट जिंकत दिमित्रोव्हने फेडररला पराभवाचा धक्का दिला.
उपांत्य सामन्यात दिमित्रोव्ह दानिल मेदवेदेवविरुद्ध शुक्रवारी झुंजणार आहे. तळाच्या रँकिंगमध्ये असलेला खेळाडू स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची २८ वर्षांतील ही पहिलीच वेळ ठरली. फेडरर २००८ नंतर येथे जेतेपद जिंकू शकलेला नाही. दिमित्रोव्ह याआधी २०१४ आणि २०१७ च्या विम्बल्डन तसेच आॅस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता. २३ वर्षांच्या मेदवेदेव याने तीनवेळचा ग्रँडस्लॅम विजेता स्टॅन वावरिंका याचा ७-६, ६-३, ३-६, ६-१ ने पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. पाचवी मानांकित स्वितोलिनाने ब्रिटनची जोहाना कोंटा हिच्यावर ६-४,६-४ ने विजय मिळविला. अमेरिकन ओपनची उपांत्यफेरी गाठणारी युक्रेनची ती पहिली खेळाडू बनली. (वृत्तसंस्था)
दुखापतीचा बहाणा नाही - फेडरर
‘यूएस उपांत्यपूर्व सामन्यात ग्रिगोर दिमित्रोव याच्याकडून पराभूत झाल्याचे शल्य असले तरी पराभवासाठी पाठीच्या दुखण्याचे कारण देणार नाही,’ असे मत दिग्गज रॉजर फेडररने व्यक्त केले. मागील सात सामन्यात दिमित्रोवला नमविणाऱ्या फेडररला पहिला आणि तिसरा सेट जिंकल्यानंतरही पाच सेटमधील संघर्षात बिगर मानांकित खेळाडूकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले. पाठीचे दुखणे बळावल्याने फेडररने अखेरच्या सेटपूर्वी मेडिकल टाईमआऊटदेखील घेतला होता.
पाच सेटमधील हा चांगला सामना होता. काहीही घडू शकले असते. मी फार आनंदी आहे. सामन्यादरम्यान मी लढतीत कायम आहे नाही, असा स्वत:ला प्रश्न विचारत होतो.
- ग्रिगोर दिमित्रोव्ह
सेरेनाचा विक्रमी १०० वा विजय
सेरेना विलियम्सने अमेरिकन ओपनमध्ये १०० वा विजय नोंदवित उपांत्य फेरी गाठली. सेरेनाने चीनच्या वांगवर ६-१, ६-० ने सरळ सेटमध्ये विजय साजरा केला. सेरेना म्हणाली, ‘१०० सामने खेळणे अविस्मरणीय आहे. पहिल्यांदा या स्पर्धेत पाय ठेवला त्यावेळी १६ वर्षांची होते. इतके सामने खेळेल असा कधीही विचार केला नव्हता.