विक्रमी आठव्या जेतेपदासाठी फेडरर सज्ज

By admin | Published: July 3, 2017 01:08 AM2017-07-03T01:08:02+5:302017-07-03T01:08:02+5:30

सोमवारपासून सुरू होत असलेल्या प्रतिष्ठेच्या विम्बल्डन स्पर्धेकडे टेनिसप्रेमींचे लक्ष लागले असून, यामध्ये स्वित्झर्लंडचा लिजंड रॉजर फेडररच्या कामगिरीबाबत

Federer ready for the eighth ever win | विक्रमी आठव्या जेतेपदासाठी फेडरर सज्ज

विक्रमी आठव्या जेतेपदासाठी फेडरर सज्ज

Next

लंडन : सोमवारपासून सुरू होत असलेल्या प्रतिष्ठेच्या विम्बल्डन स्पर्धेकडे टेनिसप्रेमींचे लक्ष लागले असून, यामध्ये स्वित्झर्लंडचा लिजंड रॉजर फेडररच्या कामगिरीबाबत सर्वांना उत्सुकता आहे.
यंदाच्या विम्बल्डनमध्ये जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला फेडरर विक्रमी आठव्यांदा विम्बल्डन जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. त्याचबरोबर, जर फेडरर विजेतेपद जिंकण्यात यशस्वी ठरला, तर टेनिसविश्वात विम्बल्डन जिंकणारा सर्वांत वयस्कर खेळाडूचा विश्वविक्रमही फेडररच्या नावावर होईल.
चार ग्रँडस्लॅमपैकी एक प्रतिष्ठित विम्बल्डन फेडररची आवडती स्पर्धा आहे. आतापर्यंत सर्वाधिक १८ ग्रँडस्लॅम जिंकलेल्या फेडररने ७ वेळा विम्बल्डनवर कब्जा केला आहे.
पुढील महिन्यात फेडरर वयाची ३६ वर्षे पूर्ण करेल. त्याला यंदाची विम्बल्डन जिंकून जेतेपद पटकावणारा सर्वाधिक वयस्कर खेळाडूचा मान मिळवण्याचीही संधी आहे. विशेष म्हणजे, गेल्याच वर्षी याच स्पर्धेत सेंटर कोर्टवर झालेल्या उपांत्य सामन्यात फेडररला पाच सेटपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात मिलोस राओनिचविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते. यानंतर त्याच्यावर टीकाकारांनी तोंडसुख घेऊन वाढत्या वयामुळे निवृत्तीचा विचार करावा, असे म्हटले होते.
या पराभवानंतर गुडघा दुखापतीमुळे फेडररला मोसमातील इतर स्पर्धेपासून सक्तीने दूर राहावे लागले होते. त्यामुळे, २०१२ मध्ये जिंकलेल्या १७व्या ग्रँडस्लॅमची संख्या वाढवण्यात त्याला प्रतीक्षा करावी लागली. या वेळी, ही संख्या वाढेल की नाही, अशी शंकाही टीकाकारांनी निर्माण केली.
परंतु, झुंजार फेडररने सर्वांची तोंडे गप्प करताना यंदाच्याच वर्षी आॅस्टे्रलियन ओपन जिंकून आपल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदांची संख्या १८ केली.
सध्या फेडररने पीट सॅम्प्रासच्या ७ विम्बल्डन विजेतेपदांची बरोबरी केली असून हा विक्रम मोडण्यासाठी त्याने कंबर कसली आहे. दुसरीकडे अँडी मरे आणि नोवाक जोकोविच हे त्याचे कडवे प्रतिस्पर्धी सध्या आपल्या फॉर्मशी झगडत आहेत.
तसेच कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदालही गुडघा दुखापतीने बेजार असल्याने ग्रास कोर्टवर नेहमी दबदबा राखणाऱ्या फेडररविरुद्ध तो कितपत झुंज देईल, अशी चर्चा टेनिसप्रेमींमध्ये आहे. या सर्व गोष्टींकडे पाहता फेडररला यंदाच्या विम्बल्डनसह जादुई १९ वा अंक गाठण्यास चांगली संधी असेल. युक्रेनचा अलेक्झांडर डोलगोपोलोव याच्याविरुद्ध फेडरर आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. (वृत्तसंस्था)

‘फेड एक्स्प्रेस’चा धडाका

गतवर्षी विम्बल्डन उपांत्य फेरीत हरल्यानंतर दुखापतीमुळे टेनिसपासून दूर राहिलेल्या फेडररने धमाकेदार कामगिरी करताना आपल्या सर्वच प्रतिस्पर्ध्यांना इशारा दिला. वर्षाच्या सुरुवातीला आॅस्टे्रलियन ओपन जिंकून दमदार सुरुवात केलेल्या फेडररने यानंतर इंडियान वेल्स, मियामी मास्टर्स आणि हॅले ओपन स्पर्धा जिंकत आपला दबदबा राखला. एकीकडे मरे, जिको आणि नदाल दुखापतींशी झगडत असताना दुसरीकडे त्यांच्याहून वयस्कर असलेल्या फेडररने पुन्हा एकदा तगडा खेळ करत त्यांच्यापुढे नवे आव्हान उभे केले आहे.

नदालसाठी कठीण परीक्षा... : यंदाच्या विम्बल्डनमध्येही फेडरर विरुद्ध नदाल अशी हायव्होल्टेज फायनल होण्याची इच्छा आहे. मात्र, विम्बल्डन कायमच नदालसाठी खडतर राहिली आहे. २००८ साली येथे जिंकलेल्या नदालने त्या वेळी फेडररलाच अंतिम सामन्यात धक्का दिला होता. तो सामना सर्वश्रेष्ठ सामना मानला जातो. यानंतर २०१० सालीही नदालने विम्बल्डनवर कब्जा केला. मात्र, २००६, २००७ आणि २०११ मध्ये त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तसेच, २००९ आणि २०१६ मध्ये तो दुखापतीमुळे विम्बल्डनपासून दूर राहिला.

गतविजेता अँडी मरे सध्या माकडहाडाच्या दुखण्याने बेजार आहे. मागील आठवड्यात सरावाच्या दरम्यानही या दुखापतीने डोके वर काढल्याने त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच, तीन वेळचा विम्बल्डन विजेता नोवाक जोकोविचपुढे कामगिरीत सातत्य राखण्याचे मुख्य आव्हान असेल. जर तो सातत्य राखण्यात यशस्वी ठरला, तर तो फेडररलाही नमवण्याची किमया करू शकतो.

स्टार सेरेना विलियम्स गरोदर असल्याने टेनिसपासून दूर आहे, तर दुसरीकडे पुनरागमन केलेली मारिया शारापोवा मांडीच्या दुखापतीमुळे विम्बल्डन खेळणार नाही. अशा परिस्थितीमुळे महिला गटात सर्वच प्रमुख खेळाडूंना विजेतेपद पटकावण्याची संधी असेल. गेली दोन वर्षे येथे विजेतेपद पटकावणारी सेरेना यंदा खेळणार नसल्याने आघाडीच्या स्तरावर रिकामपणा आला आहे. अशा परिस्थितीमध्ये शारापोवा कसर भरेल अशी आशा होती, परंतु दुखापतग्रस्त असल्याने तिला विम्बल्डन पात्रता फेरीतूनच माघार घ्यावी लागली. यामुळे इतर खेळाडूंना आपली छाप पाडण्याची संधी मिळणार आहे. पाच वेळची विम्बलडन विजेती व्हिनस विल्यम्स हिच्याकडेही प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे़

जर, अँडी मरे शारीरिकरीत्या १०० टक्के तंदुरुस्त राहिला, तर जेतेपदासाठी मी त्याला प्रबळ दावेदार मानेल. हे अत्यंत स्पष्ट आहे. शिवाय नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल यांच्याबाबत देखील माझे असेच मत आहे. - रॉजर फेडरर.

Web Title: Federer ready for the eighth ever win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.