फेडरर सुसाट, विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत धडक

By admin | Published: July 12, 2017 11:19 PM2017-07-12T23:19:22+5:302017-07-12T23:46:07+5:30

विक्रमी आठव्या विम्बल्डन विजेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने धडाकेबाज विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Federer sussat, Wimbledon semifinals | फेडरर सुसाट, विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत धडक

फेडरर सुसाट, विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत धडक

Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 12 -  विक्रमी आठव्या विम्बल्डन विजेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने धडाकेबाज विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. विशेष म्हणजे ज्या खेळाडूविरुध्द गेल्यावर्षी विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला, त्याच कॅनडाच्या मिलोस राओनिकला सरळ तीन सेटमध्ये नमवून फेडररने वचपा काढला. त्याचवेळी, ब्रिटनचा अँडी मरे आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोविच या जागतिक क्रमवारीतील अव्वल दोन खेळाडूंचे आव्हान उपांत्यपुर्व फेरीतच संपुष्टात आले. 
आपल्या जुन्या फॉर्ममध्ये खेळताना फेडररने अजूनही आपल्यात बरेच टेनिस शिल्लक असल्याचे सिध्द करत टीकाकारांना गप्प केले. सरळ तीन सेटमध्ये बाजी मारताना फेडररने राओनिकचा ६-४, ६-२, ७-६(७-४) असा फडशा पाडला. अखेरचा सेट टायब्रेकमध्ये असताना राओनिकने फेडररपुढे काहीसे आव्हान उभे केले. परंतु, फेडररने सामना चौथ्या सेटमध्ये जाणार नाही याची खबरदारी घेत सहज विजय मिळवला. फेडररने कारकिर्दीमध्ये बाराव्यांदा विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत फेडरर झेक प्रजासत्ताकच्या टॉमस बर्डिचविरुध्द लढेल. 
स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच खांदा दुखापतीशी झुंजत असलेल्या जोकोविचला खेळताना होत असलेल्या वेदनांमुळे सामना अर्धवट सोडावा लागला. यामुळे त्याचा प्रतिस्पर्धी बर्डिचचा उपांत्य फेरीत सहज प्रवेश झाला. जोकोविचने सामना सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा बर्डिच ७-६(७-२), २-० असा आघाडीवर होता. दुसरीकडे, गतविजेत्या अँडी मरेला उपांत्यपुर्व फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. पाच सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात अमेरिकेच्या सॅम क्युरे याने धक्कादायक निकालाची नोंद करत  ३-६, ६-४, ६-७(४-७), ६-१, ६-१ असा विजय मिळवला. याआधी क्युरेने तिसºया फेरीत फ्रान्सच्या कसलेल्या जो-विल्फ्रेड त्सोंगाला धक्का दिला होता. यंदाच्या स्पर्धेत मरेने सलग दहाव्यांदा उपांत्यपुर्व फेरी गाठण्याचा पराक्रम केला होता.  उपांत्य फेरीत क्युरेपुढे क्रोएशियाच्या मरिन सिलिचचे कडवे आव्हान असेल. बलाढ्य नदालला नमवलेल्या जाइल्स मुल्लरला ३-६, ७-६ (८-६), ७-५, ५-७, ६-१ असे पराभूत करुन सिलिचने आगेकूच केली. 
 
झीलचे आव्हान संपुष्टात...
मुलींच्या ज्युनिअर गटामध्ये भारताच्या झील देसाईचे आव्हान तिस-या फेरीत संपुष्टात आले. अमेरिकेच्या कायला डेविरुध्द झीलला ४-६, ४-६ असा पराभव पत्करावा लागला.

Web Title: Federer sussat, Wimbledon semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.