विम्बल्डन जिंकल्यानंतर फेडररची क्रमवारीमध्ये झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 03:18 AM2017-07-18T03:18:39+5:302017-07-18T03:18:39+5:30

रविवारी विश्वविक्रमी आठवे विम्बल्डन पटकावलेल्या दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने एटीपी आणि डब्ल्यूटीए रँकिंगमध्येही मोठी झेप घेतली आहे.

Federer's jump after Wimbledon win | विम्बल्डन जिंकल्यानंतर फेडररची क्रमवारीमध्ये झेप

विम्बल्डन जिंकल्यानंतर फेडररची क्रमवारीमध्ये झेप

Next

नवी दिल्ली : रविवारी विश्वविक्रमी आठवे विम्बल्डन पटकावलेल्या दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने एटीपी आणि डब्ल्यूटीए रँकिंगमध्येही मोठी झेप घेतली आहे. महिला गटात यंदाची विम्बल्डन विजेती गर्बाइन मुगुरुझानेही रँकिंगमध्ये आगेकूच केली आहे. दोन आठवड्यापर्यंत रंगलेल्या विम्बल्डनच्या समाप्तीनंतर सोमवारी एटीपी आणि डब्ल्यूटीएची सुधारीत रँकिंग जाहीर झाली. यानुसार ब्रिटनच्या अँडी मरेने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
फेडररने ६,५४५ गुणांसह पाचव्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. विम्बल्डनमध्ये उपांत्य फेरी आधीच आव्हान संपुष्टात आल्यानंतरही मरेने ७,७५० गुणांसह आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. त्याचवेळी, स्पेनचा राफेल नदाल (७,४६५) दुसऱ्या स्थानी असून सर्बियाचा नोव्हाक जोकोविच (६,३२५) चौथ्या स्थानी विराजमान आहे. फेडररचा देशबांधव स्टॅन वावरिंकाला दोन स्थानांचे नुकसान झाले असून तो ६,१४० गुणांसह पाचव्या स्थानी आहे. तसेच, कॅनडाच्या मिलोस राओनिकची नवव्या स्थानी घसरण झाली आहे.
महिलांमध्ये झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोवाने ६,८५५ गुणांसह आपले अग्रस्थान कायम राखले आहे. तसेच, विम्बल्डन चॅम्पियन गर्बाइन मुगुरुझाने
४,९९० गुणांसह आपले स्थान सुधारताना पाचव्या स्थानी झेप घेतली. उपविजेती व्हिनस विलियम्सनेही रँकिंगमध्ये सुधारणा करताना ४,४६१ गुणांसह नववे स्थान मिळवले. (वृत्तसंस्था)

सानियाचे स्थान कायम, बोपन्नाला फटका
दुहेरी गटाच्या रँकिंगमध्ये भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झाचे स्थान कायम राहिले असून अनुभवी रोहन बोपन्नाची मात्र घसरण झाली आहे. त्याचवेळी, अमेरिकेत विनेटका चँलेंजर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचलेल्या रामकुमार रामनाथनने १६ स्थानांची झेप घेत एकेरी रँकिंगमध्ये सर्वोत्तम १६८वे स्थान मिळवले. यासह रामकुमार भारताचा अव्वल एकेरी खेळाडू बनला असून त्याच्यानंतर युकी भांबरी (२१२), प्रज्नेश गुणेश्वरन (२१४), एन. श्रीराम बालाजी (२९३) व सुमित नागल (३०६) यांचा क्रमांक आहे. दुहेरीत, रोहन बोपन्ना २२ व्या स्थानी घसरला असून दिविज शरण (५१) आणि पूरव राजा (५२) यांना अनुक्रमे ६ व ५ स्थानांचा फायदा झाला. अनुभवी लिएंडर पेसही ३ स्थांनांनी पुढे येताना ५९व्या क्रमांकावर आहे. तसेच, महिलांमध्ये सानियाचे सातवे स्थान कायम आहे.

सँप्रासला हरवून पहिले विम्बल्डन जिंकल्यानंतर इतका यशस्वी होईल याची कल्पना केली नव्हती. मला वाटले होते की, कधीतरी विम्बल्डन फायनलपर्यंत पोहचेल आणि जिंकण्याची संधी मिळेल. आठ विजेतेपद मी पटकावेल याचा विचारही केला नव्हता. मी या वर्षी २ ग्रँडस्लॅम जिंकेल, असे कोणी सांगितले असते, तर मी ते हसण्यावर घेतले असते. - रॉजर फेडरर

अव्वल १० खेळाडू :
पुरुष : १. अँडी मरे (ब्रिटन),
२. राफेल नदाल (स्पेन), ३. रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), ४. नोव्हाक जोकोविच (सर्बिया), ५. स्टॅन वावरिंका (स्वित्झर्लंड), ६. मरिन सिलिच (क्रोएशिया),
७. डॉमनिक थिएम (नेदरलँड्स), ८. केई निशिकोरी (जपान), ९. मिलोस राओनिक (कॅनडा), १०. ग्रिगोर दिमित्रोव (बल्गेरिया)
महिला : १. कॅरोलिना प्लिस्कोवा
(झेक प्रजासत्ताक), २. सिमोना हालेप (रोमानिया), ३. अँजोलिक कर्बर
(जर्मनी), ४. जोहाना कोंटा (ब्रिटन),
५. गर्बाइन मुगुरुझा (स्पेन),
६. एलिना स्विटोलिना (युक्रेन),
७. कॅरोलिन वोज्नियाकी (डेन्मार्क),
८. स्वेतलाना कुझनेत्सोवा (रशिया),
९. व्हिनस विलियम्स (अमेरिका),
१०. एग्निज्का रँडवास्का (पोलंड)

Web Title: Federer's jump after Wimbledon win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.