फेडररची विजयी घोडदौड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 01:59 AM2019-06-03T01:59:20+5:302019-06-03T01:59:45+5:30
फ्रेंच ओपन : सेरेना विलियम्सनला तिसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का
पॅरीस : स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने याने अपेक्षित आगेकूच करताना, फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सरळ तीन सेटमध्ये बाजी मारताना फेडररने अर्जेंटिनाच्या लिओनार्डो मेयरचे आव्हान संपुष्टात आणले. महिलंमध्ये दिग्गज सेरेना विलियम्सनला तिसºयाच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
फेडररने केवळ १ तास ४२ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात ६-२, ६-३, ६-३ असा विजय मिळविला. मेयरने क्वचितच फेडररपुढे आव्हान उभे केले. अन्य सामन्यात स्पेनचा दिग्गज राफेल नदाल यानेही एकतर्फी सामन्यात बाजी मारत अर्जेंटिनाच्याच युआन इगनेसियो लोंडेरो याचा ६-२, ६-३, ६-३ असा पराभव केला. यासह नदालनेही दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
महिलांमध्ये मात्र अनपेक्षित निकालाची नोंद झाली. विक्रमी २४व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या अमेरिकेच्या सेरेनाला आपल्याच देशाच्या सोफिया केनिनविरुद्ध ६-२, ७-५ असा पराभव पत्करावा लागला. यामुळे दिग्गज मार्गारेट कोर्टच्या २४ ग्रँडस्लॅम जेतेपदांची बरोबरी करण्यासाठी सेरेनाला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. सेरेना विलियम्सन सप्टेंबर महिन्यात वयाची ३८ वर्षे पूर्ण करेल. या आधी तिने गरोदरपणामध्ये जानेवारी, २०१७ साली आपले अखेरच्या ग्रँडस्लॅम जेतेपद उंचावले होते. मात्र त्यानंतर तिला अपेक्षित यश मिळाले नाही.