रिओ ऑलिम्पिक,पॅरा ऑलिम्पिक व महिला क्रिकेट संघातील खेळाडूंचा सत्कार समारंभ संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 07:04 PM2017-09-28T19:04:18+5:302017-09-28T19:05:50+5:30
रिओ ऑलिम्पिक, रिओ पॅरा ऑलिम्पिक व महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या तीन स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रिडा मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र राज्यातील सहभागी खेळाडू अशा एकूण 23 खेळाडूंचा राज्य सरकारच्यावतीने आज रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
मुंबई - रिओ ऑलिम्पिक, रिओ पॅरा ऑलिम्पिक व महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या तीन स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रिडा मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र राज्यातील सहभागी खेळाडू अशा एकूण 23 खेळाडूंचा राज्य सरकारच्यावतीने आज रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. क्रीडामंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह येथे सत्काराचा कार्यक्रम पार पडला. रिओ ऑलिम्पिक, रिओ पॅरा ऑलिम्पिक व महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये उपविजयी संघातील खेळाडूंचा आजचा सत्कार म्हणजे या खेळाडूंचे खऱ्या अर्थाने गौरव करण्यात आला आहे. तसेच या सत्कारामुळे अन्य खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास तावडे यांनी यावेळी व्यक्त केला.
रिओ ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपट्टू साक्षी मलीक (५० लाख), हरियाणा, मार्गदर्शक कुलदिप सिंग(२५ लाख), ॲथलेटिक्स ललीता बाबर (७५ लाख), मार्गदर्शक भास्कर भोसले (२५ जाख), रोईंगपट्टू दत्तू भोकनळ (५० लाख), हॉकीपट्टू देविंदर सुनिल वाल्मिकी(५० लाख), मॅराथॉनपट्टू कविता राऊत(५० लाख), नेमबाजीपट्टू आयोनिका पॉल (५० लाख), लॉन टेनिसपट्टू प्रार्थना ठोंबरे (५० लाख) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रिओ पॅरा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू उंचउडी- मरिय्यप्पन थंगावेलू (१ कोटी), मार्गदर्शक सत्यनारायण (२५ लाख), भालाफेक- देवेंद्र झाझरिया (१ कोटी), राजस्थान, मार्गदर्शक सुनिल तंवर (२५ लाख), गोळाफेक - दिपा मलीक (७५ लाख), हरियाणा, मार्गदर्शक वैभव सरोही (१८.७५ लाख), उंचउडी - वरुन भाटी (५० लाख), नोयडा, मार्गदर्शक सत्यनारायणा (१२.५० लाख), जलतरण - सुयश जाधव (५० लाख) यांचाही रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. या क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघ उपविजेते ठरले. या संघामध्ये महाराष्ट्राच्या क्रिकेटपट्टू असलेल्या मोना मेश्राम (५० लाख), पुनम राऊत (५० लाख), स्मृती मानधना (५० लाख), संघ व्यवस्थापक तृप्ती भट्टाचार्य (१० लाख), फिजोओ थेरेपिस्ट रश्मी पवार (१० लाख) व सायकल पट्टू ओमकार जाधव (६ लाख) यांचाही सन्मान करण्यात आला.