महिला शरीरसौष्ठव :सरितादेवी ‘मिस इंडिया’
By Admin | Published: March 14, 2016 02:45 AM2016-03-14T02:45:26+5:302016-03-14T02:45:26+5:30
णिपूरच्या सरितादेवीने आपल्या अनुभवाच्या जोरावर अपेक्षित बाजी मारताना, पहिल्यांदाच झालेल्या महिलांच्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘मिस इंडिया’ किताब पटकावला.
रोहा : मणिपूरच्या सरितादेवीने आपल्या अनुभवाच्या जोरावर अपेक्षित बाजी मारताना, पहिल्यांदाच झालेल्या महिलांच्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘मिस इंडिया’ किताब पटकावला. त्याच वेळी तिला कडवी झुंज देणाऱ्या महाराष्ट्राच्या सिबालिका सहाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
प्रथमच रायगड जिल्ह्यात (रोहे) झालेल्या या दिमाखदार स्पर्धेद्वारे, भारतीय शरीरसौष्ठव क्षेत्राची ताकद दिसून आली. एकूण १५ महिला खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत यंदाही मणिपूरचे वर्चस्व दिसले. अंतिम फेरीमध्ये सरिताने सुरुवातीपासूनच सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधत स्पर्धेचा निकाल स्पष्ट केला. त्याच वेळी सिबालिका आणि लीला फड या महाराष्ट्राच्या खेळाडूंना घरच्या प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे विजेतेपदाची लढत चुरशीची व अटीतटीची होणार हे स्पष्ट होते. मात्र, प्रत्यक्षात सरिताने अप्रतिम प्रदर्शन करताना, सर्वांची मने जिंकत विजेतेपदावर एकहाती कब्जा केला. त्यामुळे सिबालिका आणि पश्चिम बंगालच्या एलुरोपा भौमिक यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी समाधान मानावे लागले. त्याच वेळी मणिपूरच्याच रेबीतादेवीने चौथे स्थान मिळवले, तर महाराष्ट्राच्या लीलाची पाचव्या स्थानी घसरण झाली.
(क्रीडा प्रतिनिधी)