भारतात टेनिस विकासासाठी एफएफटीचे स्वारस्य
By admin | Published: May 27, 2017 12:33 AM2017-05-27T00:33:42+5:302017-05-27T00:33:42+5:30
फ्रान्स टेनिस संघटना (एफएफटी) भारतात प्रशिक्षण सुविधा पुरवण्यास आणि जास्तीत जास्त क्लेकोर्ट निर्माणात मदत
पॅरिस : फ्रान्स टेनिस संघटना (एफएफटी) भारतात प्रशिक्षण सुविधा पुरवण्यास आणि जास्तीत जास्त क्लेकोर्ट निर्माणात मदत करण्यास तयार आहे; परंतु त्याचसोबत त्यांनी देशाच्या राष्ट्रीय महासंघाला प्रतिभाशाली खेळाडूंना पूर्णपणे पाठिंबा देण्याचा सल्लाही दिला आहे.
यासाठी भारतासाठी योजना बनवण्यात आल्याचे एफएफटीचे विकास संचालक सॅम्युअल प्रीमॉट यांनी सांगितले.
प्रीमॉट यांनी रोलांग गॅरांच्या एका स्पर्धा ‘रोंदिवू’प्रसंगी म्हटले, ‘भारतीय टेनिस १0 वर्षांत कोठे जाते हे आपण पाहू इच्छितो. भारताचा एकही खेळाडू अव्वल २0 मध्ये समाविष्ट नाही आणि पूर्ण जगभरातील अव्वल ५0 खेळाडूंतील ३0 ते ३५ जण हे क्ले कोर्टवर खेळताना मोठे झाले आहेत.’ रोंदिवू स्पर्धेतील मुलांना फ्रेंच ओपनमध्ये खेळण्याची संधी दिली जाते.
ते म्हणाले, ‘आम्ही भारतासाठी एक योजना तयार केली आहे. राष्ट्रीय टेनिस केंद्रातील आमचे सर्वोत्तम प्रशिक्षक आणि राष्ट्रीय तांत्रिक विभागातील कोणी जाऊन भारतात प्रशिक्षकांना प्रशिक्षण देऊ शकतात. आम्ही काही दिवसांआधी पुणे येथे बर्नार्ड पेस्ट्रे यांना पाठवले होते. आम्ही काही भारतीय मुलांनादेखील ट्रेनिंग देऊ शकतो. आपण रोहन बोपन्नापासून खूप प्रभावित आहोत. त्याने बंगलोर येथे क्ले कोर्ट अकॅडमी निर्माण केली आहे. आम्ही त्याच्याशी चर्चा केली आहे. आम्ही त्यांना मदत करू इच्छितो. त्याने क्ले कोर्टवर चांगले काम केले आहे. आम्ही आणखी लाल मातीचे क्ले कोर्ट बनवू इच्छितो आणि त्यासाठी आम्ही प्रत्येक महासंघाला प्रस्ताव दिला आहे.’
भारतात या खेळाच्या प्रसारासाठी काय व्यूहरचना आहे याविषयी विचारले असता प्रीमॉट म्हणाले, ‘पॅरिसमध्ये आमचे योजनाबद्ध कोचिंग कार्यक्रम आहेत. या खेळाला शालेय स्तरावर घेऊन जायला हवे व त्यानंतर त्याला विद्यापीठीय स्तरावर घेऊन जायला हवे. गुणवत्ता ओळखायला हवी आणि चांगल्या खेळाडूंना समर्थन द्यायला हवे. ’ (वृत्तसंस्था)