फिफामध्ये नव्या युगाचा प्रारंभ : इन्फॅटिनो

By admin | Published: February 28, 2016 01:10 AM2016-02-28T01:10:07+5:302016-02-28T01:10:07+5:30

विश्व फुटबॉल महासंघात (फिफा) नव्या युगाचा प्रारंभ सुरू झाल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष जियानी इन्फॅटिनो यांनी दिली आहे. वादाच्या गर्तेत अडकलेल्या या

FIFA launches new era: Infatino | फिफामध्ये नव्या युगाचा प्रारंभ : इन्फॅटिनो

फिफामध्ये नव्या युगाचा प्रारंभ : इन्फॅटिनो

Next

झुरिच : विश्व फुटबॉल महासंघात (फिफा) नव्या युगाचा प्रारंभ सुरू झाल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष जियानी इन्फॅटिनो यांनी दिली आहे. वादाच्या गर्तेत अडकलेल्या या क्रीडा संस्थेला नवी उभारी देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर असून, लवकरात लवकर सुधारणावादी पावले उचलण्याचे दडपणही असेल, असे ते म्हणाले.
४५ वर्षांचे यूएफा महासचिव असलेले इन्फॅटिनो सॅप ब्लाटर यांचे उत्तराधिकारी बनले. निवडणुकीत त्यांनी सहज विजय नोंदविला. त्यांच्या विजयासोबतच ब्लाटर यांच्या १८ वर्षांच्या कार्यकालाची सांगता झाली. २०७ सदस्य देशांच्या मतदानात इन्फॅटिनो यांनी आशियाचे प्रतिनिधी शेख सलमान बिन इब्राहिम अल खलिफा यांचा दुसऱ्या फेरीनंतर पराभव केला. अध्यक्षपदासाठी पाच उमेदवारांमध्ये चुरस होती. अध्यक्षपदी विराजमान होताच इन्फॅटिनो म्हणाले, ‘‘फिफा संकटातून बाहेर पडली असून, नव्या युगाचा हा प्रारंभ आहे. भ्रष्टाचाराचे काळे डाग पुसून काढण्यात आम्ही यशस्वी होऊ असा मला विश्वास आहे.’’
ब्लाटर यांनी इन्फॅटिनो यांचे अभिनंदन केले. ब्लाटर म्हणाले, ‘‘अनुभव, क्षमता आणि डावपेच तसेच मुत्सद्दीपणाच्या जोरावर इन्फॅटिनो हे माझे काम पुढे नेतील आणि फिफाला नावलौकिक मिळवून देतील अशी अपेक्षा आहे.’’ सन २०१८च्या
फुटबॉल विश्वचषकाचा यजमान रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमीर पुतिन यांनीदेखील इन्फॅटिनो यांचे अभिनंदन केले आहे. (वृत्तसंस्था)

इन्फॅटिनोंसोबत काम
करण्यास इच्छुक : प्रफुल्ल पटेल
भारतात फुटबॉल विकासासाठी फिफाची गरज आहे. नवे अध्यक्ष जियानी इन्फॅटिनो यांच्यासोबत आम्ही मधूर संबंध ठेवण्यास इच्छुक असल्याची प्रतिक्रिया अ. भा. फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली. फिफा निवडणुकीत पटेल हे भारताचे प्रतिनिधी होते. निवडणूक जिंकताच पटेल यांनी इन्फॅटिनो यांचे अभिनंदन केले.

अभिनंदनाचा वर्षाव!
इंग्लंड फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष ग्रेग टाईक आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले जॉर्डनचे प्रिन्स अली बिन अल हुसेन यांनी नव्या अध्यक्षांचे अभिनंदन केले असून, फिफा प्रगतिपथावर जाण्यास इन्फॅटिनो यांचे नेतृत्व लाभदायी ठरावे. फुटबॉलच्या भविष्यासाठी अनेक सुधारणावादी पावले स्थायी स्वरूपात उचलली जावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


‘‘एआयएफएफ नव्या अध्यक्षांसोबत काम करण्यास इच्छुकआहे. यामुळे भारतात फुटबॉल विकासाला चालना मिळेल, असा मला ठाम विश्वास वाटतो.’’ पटेल यांनी इन्फॅटिनो आणि फिफाच्या कार्यकारी समितीचे सदस्य प्रिन्स अब्दुल्ला यांच्यासोबत छायाचित्रदेखील काढून घेतले.

Web Title: FIFA launches new era: Infatino

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.