फिफा समाधानी; पण वेग वाढवा!
By admin | Published: March 23, 2017 12:21 AM2017-03-23T00:21:28+5:302017-03-23T00:21:28+5:30
आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या तयारीचा ‘काउंटडाउन’ सुरू झाला आहे.
नवी दिल्ली : आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या तयारीचा ‘काउंटडाउन’ सुरू झाला आहे.त्यासाठी फिफाचे शिष्टमंडळ भारतात दाखल झाले असून त्यांनी स्पर्धास्थळांना भेट द्यायला सुरुवात केली. बुधवारी शिष्टमंडळाने दिल्लीतील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमची पाहणी केली. त्यांनी तयारीवर समाधान व्यक्त केले असले तरी महत्त्वपूर्ण क्षेत्रात म्हणजे प्रतिस्पर्धी आणि ट्रेनिंग यांच्यातील कामात वेग वाढविण्याची सूचना केली.
या स्पर्धेसाठी आता केवळ २०० दिवस उरले आहेत. फिफाचे आठ सदस्यीय शिष्टमंडळ आणि त्यांचे प्रमुख जैमे यार्जा हे देशातील आठ केंद्रांना भेट देणार आहेत. यार्जी म्हणाले, की आम्ही समाधानी आहोत. कामात सुधारणा होताना दिसत आहे. असे असले तरी दिल्ली जगातील महत्त्वपूर्ण शहर आहे. येथील स्टेडियमला सर्वाधिक सुंदर सादर केले पाहिजे. आम्हाला इतर गोष्टीत काही कमतरता आढळल्या नाहीत. तयारीच्या कामांत अधिक वेग असावा, असे वाटते. ट्रेनिंग आणि प्रतिस्पर्धीच्या क्षेत्रातील थोडे काम बाकी आहे. आयोजकांकडे चांगल्या योजना असून ते योग्य रणनीतीनुसार काम करीत आहेत.
दिग्गज येतील....
या स्पर्धेच्या प्रचारार्थ काही दिग्गज खेळाडू भारतात येतील. २० वर्षांखालील विश्वचषक ‘ड्रॉ’साठी दिएगो माराडोना आणि पाब्लो आइमार हे कोरियात गेले होते. १५ मार्च रोजी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या प्रचारासाठी काही दिग्गज येतील. आम्ही त्या नावांचा विचार करीत आहोत. सध्यातरी त्यांची नावे माझ्याकडे नाहीत. फुटबॉल जगतातील स्टार खेळाडूंना या स्पर्धेच्या कार्यक्रमात आम्ही सहभागी करू, असे यार्जा म्हणाले.
१५ एप्रिलला ‘फातोर्डा’ फिफाच्या ताब्यात
देशात पहिल्यांदाच होणाऱ्या १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवरील कामे वेगाने सुरू आहेत. १५ एप्रिलपासून हे स्टेडियम फिफाच्या ताब्यात असेल. त्यानंतर फिफा आयोजन समिती स्टेडियममध्ये अंतिम बदल करतील. गुरुवारी फिफाचे शिष्टमंडळ स्टेडियमला भेट देतील. तयारीचा आढावा घेतील. काही सूचनाही करतील, असे असले तरी स्टेडियमचे काम अंतिम टप्पयात आहे, अशी माहिती स्टेडियम व्यावस्थापक लक्ष्मीदास मंगेशकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
फिफाच्या शिष्टमंडळाने दिलेल्या सूचनेवरून स्टेडियमवर आणखी दोन विद्युत टॉवर उभारण्यात आले. तसेच स्टेडियमवर ‘ग्रास क्लॅरिफार्इंग वर्किंगचे’ही काम चालू आहे. रुटिंग वर्क आॅफ सिडिंगही करण्यात आले आहे. याबरोबरच स्टेडियमवरील अंतर्गत भागातील कामेही जोरात चालू आहेत. त्यांच्यावरही शेवटचा हात फिरविण्यात येत आहे. फिफाच्या मागणीनुसार प्लेयर्स चेंजिंग रुम्स, रेफ्री रुम यांच्या खोल्यातही वाढ करण्यात आली आहे. स्टेडियमवर वैद्यकीय, डोपिंग कंट्रोल, सामना आयुक्त यांच्या विशेष खोल्या असतील. व्हीआयपी खुर्च्यांची संख्या आता ३०० पर्यंत करण्यात आली. मीडियासाठी आसनव्यवस्थाही वाढविण्यात आल्याचे मंगेशकर यांनी सांगितले.
चौकट
फिफाचे शिष्टमंडळ गुरुवारी (दि.२३) सकाळी १० वाजता फातोर्डा स्टेडियमला भेट देतील. त्यांनी दिलेल्या सूचनेची अंमलबजावणी झाली की नाही, याची ते शहानिशा करतील. त्यांचे समाधान झाल्यास ते १५ एप्रिलला स्टेडियचा ताबा घेतील.
फोटो कॅप्शन : फातोर्डा स्टेडियमवर फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी मैदानावर ग्रास क्लॅरिफार्इंगचे काम चालू असताना . (छाया : पिनाक कल्लोळी)