फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धा; भारतीय संघाने पुन्हा गमावली विजयाची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 04:24 AM2019-11-15T04:24:04+5:302019-11-15T04:24:15+5:30
अत्यंत कडाक्याच्या थंडीत झालेल्या सामन्यात इन्जुरी टाईममध्ये केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर भारतीय फुटबॉल संघाने अफगाणिस्तानविरुद्धचा पराभव कसाबसा टाळत सामना १-१ असा बरोबरीत सोडवला.
दुशाम्बे (ताजिकिस्तान) : येथे अत्यंत कडाक्याच्या थंडीत झालेल्या सामन्यात इन्जुरी टाईममध्ये केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर भारतीय फुटबॉल संघाने अफगाणिस्तानविरुद्धचा पराभव कसाबसा टाळत सामना १-१ असा बरोबरीत सोडवला. यासह भारतीय संघाला फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धेत सलग तिसऱ्या सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले. सुपर सब खेळाडू सीमिनलेन डोंगेल भारतीय संघाचा हिरो ठरला.
सेंट्रल रिपब्लिकन स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारतीय संघाकडून विजयाची अपेक्षा होती. मात्र पुन्हा एकदा ‘ब्ल्यू टायगर्स’कडून निराशा झाली. पहिल्या सत्रातील अतिरिक्त वेळेत झेल्फागर नाझरीने (४५+१) अफगाणिस्तानकडून पहिला गोल करत भारताला मोठा धक्का देत. या जोरावर मध्यंतराला अफगाणिस्तानने १-० अशी आघाडी घेत्ली होती. दुसºया सत्रात भारतीयांनी आक्रमक पवित्रा घेत पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र गोल करण्यात सातत्याने येत असलेल्या अपयशामुळे भारतीय खेळाडूंवरील दडपण स्पष्ट दिसत होते. सामन्याची निर्धारीत वेळ टळून गेल्यानंतरही भारताला पिछाडी भरुन काढण्यात यश न आल्याने भारताचा पराभव स्पष्ट दिसू लागलेला. मात्र मोक्याच्यावेळी मैदानात आलेल्या डोंगेलने इंज्युरी टाईममध्ये ९३व्या मिनिटाला निर्णायक गोल करत भारताचा पराभव टाळला. यानंतर भारतीय संघ ई गटामध्ये चौथ्या स्थानी कायम आहे. भारताच्या खात्यात चार सामन्यांतून ३ गुणांची नोंद असून अफगाणिस्तान चार गुणांसह तिसºया स्थानी आहे.