विराट-रैनाच्या लढतीत फायनलचा निर्णय
By admin | Published: May 24, 2016 04:26 AM2016-05-24T04:26:43+5:302016-05-24T04:26:43+5:30
विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर गेल्या सातपैकी ६ लढतींत विजय मिळवणारा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि सर्व प्रमुख फलंदाजांच्या उपयुक्त
बंगळुरू : विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर गेल्या सातपैकी ६ लढतींत विजय मिळवणारा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि सर्व प्रमुख फलंदाजांच्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर साखळी फेरीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या गुजरात लायन्स संघांदरम्यान मंगळवारी आयपीएलच्या नवव्या पर्वातील पहिली क्वालिफायर रंगणार आहे. या लढतीच्यानिमित्ताने ‘फलंदाजांची लढाई’ अनुभवण्याची संधी मिळणार असून वर्चस्व गाजवणारा संघ अंतिम फेरीत धडक मारेल.
आयपीएलमध्ये प्रथमच सहभागी होताना गुजरात लायन्स संघाने साखळी फेरीत १४ पैकी ९ सामन्यांत विजय मिळवला आणि १८ गुणांची कमाई करीत अव्वल स्थान पटकावले. साखळी फेरीच्या अखेरच्या टप्प्यात आरसीबीच्या फलंदाजांसह गोलंदाजांचीही कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्यांनी ८ सामन्यांत विजय मिळवला आणि १६ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. सनरायझर्स हैदराबाद व कोलकाता नाईट रायडर्स या संघांचेही सारखे १६ गुण आहेत, पण आरसीबीने सरस नेटरनरेटच्या आधारावर थेट क्वालिफायर खेळण्याची पात्रता गाठली.
आरसीबी व लायन्स संघांदरम्यान चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीतील विजेता संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे, तर पराभूत संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी आणखी एक संधी मिळेल. कोहलीच्या चमकदार खेळीच्या जोरावर आरसीबीने यापूर्वीच्या लढतीत अनुकूल निकाल मिळवला. सलग चार विजयांसह या लढतीत सहभागी होणारा आरसीबी संघ कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे.
गुजरात लायन्स संघाचा विचार करता त्यांचा संघ अधिक समतोल आहे. आरसीबीच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना संधी मिळाली आहे, तर लायन्सच्या जवळजवळ सर्वच फलंदाजांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. ड्वेन ब्राव्होला फलंदाजीमध्ये अधिक संधी मिळाली नाही, पण त्याने गोलंदाजीमध्ये छाप सोडली आहे.
विंडीजचा हा अष्टपैलू खेळाडू डेथ ओव्हर्समध्ये उपयुक्त गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत १५ बळी घेतले आहेत. धवल कुलकर्णीने (१४ विकेट) नवा चेंडू चांगला हाताळला आहे, तर गेल्या काही लढतींमध्ये स्मिथने चांगली गोलंदाजी करीत रैनाला पर्याय उपलब्ध करून दिला आहे. स्विंग गोलंदाज प्रवीणकुमार अनुकूल परिस्थितीमध्ये धोकादायक ठरू शकतो. रवींद्र जडेजा आणि प्रवीण तांबे यांच्यावर फिरकीची जबाबदारी आहे. त्यांना अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. चायनामन शिविल कौशिकने आपल्या अनोख्या शैलीमुळे फलंदाजांना विचार करण्यास भाग पाडले आहे. (वृत्तसंस्था)
प्रतिस्पर्धी संघ
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : विराट कोहली (कर्णधार), वरुण अॅरॉन, अबू नेचिम, एस. अरविंद, स्टुअर्ट बिन्नी, यजुवेंद्र चहल, एबी डीव्हिलियर्स, प्रवीण दुबे, ख्रिस गेल, ट्रेव्हिस हेड, इक्बाल अब्दुल्ला, केदार जाधव, अक्षय कर्णेवार, सरफराज खान, विक्रमजित मलिक, मनदीपसिंग, हर्षल पटेल, लोकेश राहुल, परवेझ रसूल, केन रिचर्डसन, सचिन बेबी, विकास टोकस, शेन वॉटसन, डेव्हिड विसे, ख्रिस जॉर्डन, तबरेज शम्सी.
गुजरात लायन्स :- सुरेश रैना (कर्णधार), ड्वेन स्मिथ, ब्रॅन्डन मॅक्युलम, अॅरॉन फिंच, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, जेम्स फॉल्कनर, ईशान किशन, प्रवीण कुमार, धवल कुलकर्णी, शिविल कौशिक, सरबजित लढ्ढा, अमित मिश्रा, अक्षदीप नाथ, ड्वेन ब्राव्हो, पारस डोग्रा, एकलव्य द्विवेदी, शादाब जकाती, प्रदीप सांगवान, जयदेव शाह, उमंग शर्मा, डेल स्टेन, प्रवीण ताम्बे आणि अॅण्ड्य्रू टाय.