विजय मिळविणे अंतिम लक्ष्य : ताहिर
By admin | Published: March 24, 2016 01:27 AM2016-03-24T01:27:43+5:302016-03-24T01:27:43+5:30
आमच्या संघात उत्कृष्ट गोलंदाज असल्याने खेळपट्टीचे स्वरूप कसे असेल याची चिंता बाळगण्याचे कारण नाही. महत्त्वाच्या सामन्यात विजय हेच अंतिम लक्ष्य असेल असे
नागपूर : आमच्या संघात उत्कृष्ट गोलंदाज असल्याने खेळपट्टीचे स्वरूप कसे असेल याची चिंता बाळगण्याचे कारण नाही. महत्त्वाच्या सामन्यात विजय हेच अंतिम लक्ष्य असेल असे द. आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहिर याचे मत आहे.सरावानंतर व्हीसीएच्या जामठा मैदानावर पत्रकारांशी बोलताना ताहिर म्हणाला,‘ विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध २२९ धावा केल्यानंतरही पराभवाचा सामना करावा लागला. अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळविल्याने उपांत्य फेरीच्या आशा कायम आहेत.’ विजयासाठी मात्र कष्ट घ्यावे लागले अशी कबुली ताहिरने दिली.
विंडीजविरुद्ध विजयच हवा
पहिल्या दोन्ही सामन्यात फलंदाज व गोलंदाजांनी आपापली जबाबदारी पार पाडली. वेस्ट इंडिजविरुद्धची लढत आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. या सामन्यात आम्ही पूर्ण ताकदीने खेळणार असून चुका टाळण्यावर भर असेल. वेस्ट इंडिज संघात ख्रिस गेल व अनेक आक्रमक फलंदाज आहेत. त्यांना रोखण्याची जबाबदारी गोलंदाजांची राहील. भेदक मारा व दमदार फलंदाजीच्या बळावर विजय मिळण्यात यश मिळेल यात शंका नसल्याचे ताहिरने स्पष्ट केले.
खेळपट्टीची चिंता नाही
नागपूर येथील खेळपट्टीबद्दल विचारले असता ताहिर म्हणाला, खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करीत असल्याबद्दल चर्चा सुरू असून अशा खेळपट्टीवर मारा करणे आवडेल. नोव्हेंबर महिन्यात याच स्टेडियमवर आम्ही कसोटी सामना खेळलो. त्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. कसोटी आणि टी-२० सामन्यात फवरक असल्याचे ताहिरने स्पष्ट केले.
ड्युमिनी संघाबाहेर
अष्टपैलू खेळाडू जे.पी. ड्युमिनी पाठीच्या दुखापतीमुळे ‘अनफिट’ असून विंडीजविरुद्ध खेळणार नसल्याचे स्पष्ट करीत ताहिर म्हणाला, ड्युमिनी खेळत नसल्यामुळे संघाला काही प्रमाणात चिंता आहे. मात्र, संघातील इतर युवा खेळाडूंना प्रतिभा सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळणार असून ज्यांना संधी मिळेल, त्यांनी जबाबदारी सांभाळावी. स्वत:च्या कामगिरीवर समाधान व्यक्त करीत इम्रान ताहिरने विश्वकरंडकात देशाचे प्रतिनिधित्व करणे, माझ्यासाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे. सर्वात मोठ्या स्पर्धेसाठी मला विशेष तयारी करावी लागली नाही असेही ताहिरने सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)