पुणेरी पलटनला हरवून पाटना पायरेटस प्रो-कबड्डीच्या अंतिम फेरीत
By admin | Published: March 4, 2016 08:13 PM2016-03-04T20:13:36+5:302016-03-04T21:17:29+5:30
प्रो कबड्डी स्पर्धेत पाटणा पायरेटसने पुणेरी पलटनवर १९ गुणांच्या फरकाने मोठा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - प्रो कबड्डी स्पर्धेची प्रथमच उपांत्यफेरी गाठणा-या पुणेरी पलटनने उपांत्यफेरीच्या सामन्यात निराशा केली. पाटना पायरेटसने पुणेरी पलटनवर १९ गुणांच्या फरकाने मोठा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
मध्यंतरापूर्वीच पाटणा पायरेटसने मोठी आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर पुणेरी पलटनने खेळ उंचावला मात्र तोपर्यंत उशीर झाला. सामना संपला तेव्हा पाटणा पायरेटसकडे ४० तर, पुणेरी पलटनच्या खात्यावर २१ गुण होते. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये हा सामना झाला.
स्पर्धेच्या इतिहासात पुणेरी पलटनने पहिल्यांदाच उपांत्यफेरी गाठली होती. यंदाच्या सत्रात संघामध्ये मोठे फेरबदल करून सर्वांनाच चकीत करताना पुणेरी पलटणने स्पर्धेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली होती. कर्णधार मनजित चिल्लरचे आक्रमक नेतृत्व संघाच्या यशामध्ये निर्णायक ठरले असून, अजय ठाकूर, दीपक हुडा, जसमेर सिंग गुलिया या अनुभवी खेळाडूंची कामगिरीही महत्वपूर्ण ठरली होती.
यंदा तीन सामने बरोबरीत राखलेल्या पुणेकरांनी दोनवेळा बलाढ्य पटना पायरेट्सला बरोबरीत रोखले असल्याने पहिल्या उपांत्य लढतीत या दोन संघांतील थरार पुन्हा एकदा अनुभवता येईल अशी कबड्डीरसिकांची अपेक्षा होती. गतविजेते आणि अव्वलस्थान मिळवलेल्या यू मुंबा आणि बंगाल वॉरियर्सविरुद्ध उपांत्यफेरीचा दुसरा सामना होणार आहे.