कोल्हापुरात रंगणार अंतिम थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2016 05:28 AM2016-09-24T05:28:59+5:302016-09-24T05:28:59+5:30
मोहितेज रेसिंगचे अभिषेक मोहिते व जे. के. टायरचे अकबर इब्राहिम यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : तेराव्या जे. के. टायर-एफएमएससीआय राष्ट्रीय रोटेक्स मॅक्स कार्टिंग स्पर्धेच्या पाचव्या अणि अंतिम फेरीचे आज, शनिवारपासून आयोजन केल्याची माहिती मोहितेज रेसिंगचे अभिषेक मोहिते व जे. के. टायरचे अकबर इब्राहिम यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
कार्टिंगचा हा थरार हुपरी रोडवरील मोहितेज रेसिंग अकॅडमीच्या सर्किट ०९ ट्रॅकवर होणार आहे. शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून या पाचव्या फेरीतील पोल पोझिशन फेरी होणार आहे. तर रविवारी अंतिम फेरी रंगणार आहे. या स्पर्धा सिनिअर मॅक्स, ज्युनिअर मॅक्स आणि मायक्रो मॅक्स या तीन गटांत होत असून त्यात देशातील नामवंत रेसिंगपटू सहभागी होणार आहेत. यामध्ये अव्वल मानांकित विष्णू प्रसाद (३२८ गुण), रिकी डॉनिसन (३२४ गुण), कोल्हापूरचे धु्रव मोहिते, चित्तेश मंडोडी व मेको रेसिंगचा प्रथमेश देसाई यांच्यातच खरी लढत होणार आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ या रेसिंग ट्रॅकवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गो-कार्टिंग रेस होत आहेत.
१३ ते १६ वयोगटांतील ज्युनिअर मॅक्स गटात फरिदाबादचा मानव शर्मा (३३४ गुण) आणि बंगरुळचा यश आराध्ये (३२८ गुण) यांच्यात अटीतटीची चुरस होईल. ७ ते १२ वयोगटातील मायक्रो मॅक्स गटात मेको रेसिंच्या शहानअली मोहसिनला तब्बल २0 गुणांची आघाडी असून त्याचे ३४८ गुण आहेत. बंगरुळचा अर्जुन नायर ३२८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
यापूर्वीच्या फेऱ्या कोल्हापूरसह बंगलोर, हैदराबाद, कोईमत्तूर येथे पार पडल्या आहेत. पाचवी आणि अंतिम फेरी कोल्हापुरात होत आहे. कोल्हापुरात यापूर्वी झालेल्या शर्यतीत दोन वर्षानंतर पुनरागमन करणाऱ्या चित्तेश मंडोडी याने अनपेक्षितरित्या दुसऱ्या स्थानावर बाजी मारली होती. (प्रतिनिधी)