...अखेर जोडी जमली
By admin | Published: June 12, 2016 06:19 AM2016-06-12T06:19:06+5:302016-06-12T06:19:06+5:30
अनुभवी टेनिसपटू लियांडर पेस याचा सातव्यांदा आॅलिम्पिकमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एआयटीएफच्या शिष्टाईनंतर रोहण बोपन्ना याने पेसला दुहेरीचा
नवी दिल्ली : अनुभवी टेनिसपटू लियांडर पेस याचा सातव्यांदा आॅलिम्पिकमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एआयटीएफच्या शिष्टाईनंतर रोहण बोपन्ना याने पेसला दुहेरीचा जोडीदार म्हणून स्वीकारले. यासोबतच रिओ आॅलिम्पिकबाबत भारतीय संघाबद्दलच्या सर्व शंकांना देखील विराम मिळाला आहे.
बोपन्ना हा आधी साकेत मिनेनीसोबत जोडी बनविण्यास उत्सुक होता; पण टेनिस महासंघ पेस- बोपन्ना हेच पदक जिंकू शकतात, यावर ठाम राहिल्याने बोपन्नाला एक पाऊल मागे यावे लागले. बोपन्नाला मिश्र दुहेरीत सानिया मिर्झासोबत खेळायचे असल्याने त्याच्याकडे पदक जिंकण्याच्या दोन संधी असतील. सानिया दुहेरीत प्रार्थना ठोंबरे हिच्यासोबत खेळणार आहे. प्रार्थना सानियाच्या अकादमीत सराव करते. बोपन्ना - पेस यांना एआयटीएफने डेव्हिस चषक संघातही स्थान दिले आहे.
एआयटीएने यंदा सात सदस्यीय संघ जाहीर केला असून, बोपन्ना-पेस यांनी रिओ आॅलिम्पिकआधी काही वेळ सोबत घालविल्यास ताळमेळ बसू शकेल, असे महासंघाला वाटते. एआयटीए अध्यक्ष आणि आयटीएफ उपाध्यक्ष अनिल खन्ना यांनी संघ जाहीर केल्यानंतर सांगितले की, खेळाडूंनी आमच्या शिष्टाईचा स्वीकार केला आहे. आता देशाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी सहजपणे खेळावे. डेव्हिस चषक सांघिक स्पर्धा असल्याने आॅलिम्पिकपूर्वी ताळमेळ बसेल, असा विश्वास वाटतो. डेव्हिस चषक कोच झिशन अली याला आॅलिम्पिकसाठी कर्णधार नियुक्त करण्यात आले आहे.
स्वप्न साकार : पेस
रिओ आॅलिम्पिकसाठी बोपन्नाचा जोडीदार म्हणून निवड झालेला भारताचा सर्वांत अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेसने स्वप्न साकार झाल्यासारखे वाटत असल्याचे म्हटले आहे. प्रतिक्रिया देताना पेसने म्हटले की, विक्रमी सातव्यांदा आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे म्हणजे स्वप्न साकार झाल्यासारखेच आहे. मी त्यासाठी अखिल भारतीय टेनिस महासंघाचा (एआयटीए) आभारी आहे. महासंघामुळे मला पुन्हा एकदा जर्सीवर तिरंगा लावण्याची संधी मिळणार आहे.’ १७ जून रोजी ४३ वर्षांचा होणारा पेस म्हणाला, ‘राष्ट्रध्वजासाठी खेळणे माझ्यासाठी नेहमी प्रेरणादायी ठरले आहे. मी चाहत्यांचा आभारी आहे. त्यांचे प्रेम व पाठिंबा कारकिर्दीत माझ्यासाठी टॉनिक ठरले आहे.’
‘‘याआधी आमच्या जोडीने विशेष कमाल केलेली नाही; पण मी टेनिस संघटनेच्या निर्णयाचे स्वागत करतो. आमचा खेळ एकमेकांना अनुकूल आणि पूरक नव्हता. यंदा काही वेगळे घडेल, अशी अपेक्षा बाळगतो.’’
- रोहण बोपन्ना.