...अखेर दिल्लीच्या विजयाचा दुष्काळ संपला

By admin | Published: April 16, 2015 01:25 AM2015-04-16T01:25:00+5:302015-04-16T01:25:00+5:30

युवराजसिंग (३९ चेंडूंत ५५) व मयंक अगरवाल (४८ चेंडंूत ६८) यांच्या तडाखेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने सलग ११ पराभवांचे दुष्टचक्र संपविले.

Finally, the drought of Delhi's Vijay's end was over | ...अखेर दिल्लीच्या विजयाचा दुष्काळ संपला

...अखेर दिल्लीच्या विजयाचा दुष्काळ संपला

Next

पंजाबवर ५ गडी व एक चेंडू राखून मात : युवराजसिंग-मयंक अग्रवालची अर्धशतकी खेळी
विशाल शिर्के - पुणे
युवराजसिंग (३९ चेंडूंत ५५) व मयंक अगरवाल (४८ चेंडंूत ६८) यांच्या तडाखेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने सलग ११ पराभवांचे दुष्टचक्र संपविले. किंग्ज इलेव्हन पंजाबने दिलेले १६६ धावांचे लक्ष्य १ चेंडू व ५ गडी राखून पार केले. मयंक अगरवालला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर प्रेक्षकांना पंजाबचा वीरेंद्र सेहवाग व दिल्लीच्या युवराजसिंगच्या फलंदाजीची जादू पाहायला मिळाली. तसेच, मयंक अगरवालनेदेखील उत्कृष्ट फटकेबाजी करीत एका चांगल्या खेळीची मेजवानी दिली. युवराजने ५ चौकार व ३ षटकारांच्या साह्याने ५५ धावांची खेळी साजरी केली. तर, अगरवालने ७ चौकार व २ षटकार तडकावीत ६८ धावांची तडाखेबाज खेळी केली. अगरवाल ४२
धावांवर असताना संदीप शर्माकडून त्याचा झेल सुटल्याने त्याला जीवनदान मिळाले. याचा त्याने फायदा उठविला.
युवराज व मयंकने तिसऱ्या विकेटसाठी तब्बल १०६ धावांची भागीदारी करीत संघाला विजयाच्या समीप नेले. युवराजसिंग १९व्या षटकात अनुरितसिंगच्या गोलंदाजीवर संदीप शर्माकडे झेल देऊन परतला. त्या वेळी विजयाला केवळ ७ धावा शिल्लक होत्या. मात्र, पुढच्याच चेंडूवर अनुरितने अगरवालचा त्रिफळा उडविला. शेवटच्या षटकात एका खराब फटक्यावर केदार जाधव (३) अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर अनुरितकडे झेल देऊन परतला. अँजेलो मॅथ्यूजने विजयासाठी १ धाव हवी असताना चौकार ठोकून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
पंजाबने दिलेल्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला तिसऱ्याच षटकांत झटका बसला. संदीप शर्माच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यर (६) अनुरितसिंगकडे झेल देऊन परतला. तर, आठव्या षटकांत जेपी ड्युमिनीला २१ धावांवर अक्षर पटेलने धावबाद केले. त्यामुळे १ बाद २३ वरून २ बाद ५३ स्थिती झाली. मात्र, त्यानंतर मयंक अगरवाल व युवराजसिंग यांनी फलंदाजीची सूत्रे होतात घेऊन संघाच्या विजयाची पायाभरणी केली.
तत्पूर्वी पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वीरेंद्र सेहवाग (४७) व वृद्धिमान साहा (३९) यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेली ७१ धावांच्या भागीदारी, मुरली विजय (१९), जॉर्ज बेली (१९) यांच्या खेळीमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबने २० षटकांत ७ बाद १६५ धावा उभारल्या. चांगली सुरुवात मिळूनही मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्याने पंजाबला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. साहाची दुसरी विकेट १०४ धावांवर गमावल्यानंतर पंजाबने केवळ ३३ धावांत ४ गडी गमावले.
त्यानंतर जॉर्ज बेली याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ११ चेंडूत १ षटकार व १ चौकाराच्या साह्याने १९ धावा केल्या. तर, अक्षर पटेल याने (१०) धावा केल्या. हे दोघेही फलंदाज ताहीरच्या २०व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर बाद झाले. इम्रान ताहीरने ३, तर जेपी ड्युमिनीने २, अँजेलो मॅथ्यूज व अमित मिश्रा याने प्रत्येकी एक बळी घेतला.

एका वर्षाच्या प्रतीक्षेनंतर दिल्ली विजयी
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत २७ एप्रिल २०१४नंतर दिल्ली डेअरडेव्हिल्सने १५ एप्रिल २०१५ रोजी विजय नोंदविला. २७ एप्रिलला शारजा येथे झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला सहा विकेटनी पराभूत केले होते.

किंग्ज इलेव्हन पंजाब : मुरली विजय झे. ड्युमिनी गो. मॅथ्यूज १९, वीरेंद्र सेहवाग झे. नाइल गो. ड्युमिनी ४७, रिद्धिमान साहा त्रि. गो. मिश्रा ३९, डेव्हिड मिलर त्रि. गो. ड्युमिनी ५, ग्लेन मॅक्सवेल झे. तिवारी गो. इम्रान ताहीर १५, जॉर्ज बेली झे. अय्यर गो. इम्रान ताहीर १९, अक्षर पटेल झे. मॅथ्यूज गो. इम्रान ताहीर १३, रिषी धवन नाबाद ०; अवांतर : ८; एकूण : ७ बाद १६५; गोलंदाजी : नाथन कोल्टर नाइल ३-०-१४-०, डोमिनिक मुथ्थ्यूस्वामी ३-०-२४-०, अ‍ॅँजेलो मॅथ्यूज ३-०-२३-१, अमित मिश्रा ४-०-३४-१, इम्रान ताहीर ४-०-४३-३, युवराजसिंग १-०-९-०, जेपी ड्युमिनी २-०-१६-२.
दिल्ली डेअरडेव्हिल्स : मयंक अगरवाल त्रि. गो. अनुरितसिंग ६८, श्रेयांस अय्यर झे. अनुरितसिंग गो. संदीप शर्मा ६, जेपी ड्युमिनी धावबाद (पटेल) २१, युवराजसिंग झे. संदीप शर्मा गो. अनुरितसिंग ५५, अ‍ॅँजेलो मॅथ्यूज नाबाद ६, केदार जाधव झे. अनुरितसिंग गो. पटेल ३, मनोज तिवारी नाबाद ०; अवांतर : १०; एकूण : १९.५ षटकांत १६९; गोलंदाजी : संदीप शर्मा ४-०-३०-१, अनुरितसिंग ४-०-३३-२, मिशेल जॉन्सन ४-०-४३-०, रिषी धवल ३-०-२३-०, अक्षर पटेल ३.५-०-२८-१, ग्लेन मॅक्सवेल १-०-१०-०.

 

Web Title: Finally, the drought of Delhi's Vijay's end was over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.