सर्वोत्कृष्ट संघांविरुद्ध चांगल्या कामगिरीवर भर
By admin | Published: May 27, 2017 12:30 AM2017-05-27T00:30:38+5:302017-05-27T00:30:38+5:30
‘जिद्द आणि विश्वास यांची सांगड घालून जग जिंकता येते’ हा संवाद यवतमाळच्या आकाश चिकटे याने खरा ठरविला आहे.
नवी दिल्ली : ‘जिद्द आणि विश्वास यांची सांगड घालून जग जिंकता येते’ हा संवाद यवतमाळच्या आकाश चिकटे याने खरा ठरविला आहे. ग्रामीण भागातील खेळाडू ते भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकिपर असा प्रवास करणाऱ्या आकाशने वर्षभरात जो अनुभव संपादन केला त्याबळावर तो जगातील सर्वोत्कृष्ट संघांविरुद्ध चांगली कामगिरी करण्यास सज्ज झाला आहे.
मागच्या वर्षी मलेशियातील सुल्तान अझलन शाह हॉकी कपमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून शानदार कामगिरी करीत असलेला युवा आकाश या खेळात नावारुपास आला. मागच्यावर्षी तो आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताचा राखीव गोलकिपर होता. पी. आर. श्रीजेश जखमी होताच आकाशला संधी मिळताच त्याचे त्याने सोने केले. मलेशियाविरुद्ध भारताच्या २-१ ने मिळविलेल्या विजयात आकाशची भूमिका मोलाची ठरली होती. भारताने चॅम्पियन्स पाकिस्तानविरुद्ध फायनलमध्ये ३-२ ने विजय मिळवित स्पर्धा जिंकली. या सामन्यात पाकचे अनेक हल्ले आकाशने शिताफीने परतवून लावले.
यंदा देखील सुल्तान अझलन शाह चषकात श्रीजेश जखमी झाल्याने संघाबाहेर पडला. लगेचच चिकटेने जबाबदारी सांभाळली. या स्पर्धेत भारताने कांस्य पदक जिंकले होते. मागच्यावर्षीच्या तुलनेत माझ्या कामगिरीत लक्षनीय सुधारणा झाल्याचे अकाशचे मत आहे.
बंगलोर येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणात सुरू असलेल्या भारतीय संघाच्या राष्ट्रीय शिबिरात आकाश गोलकिपिंगमध्ये घाम गाळत आहे. सराव सत्रानंतर तो म्हणाला, ‘देशासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यापासून गोलकिपिंगमध्ये बरीच सुधारणा करावी लागेल याचे संकेत मिळाले. याची सुरुवात मी आत्मविश्वास वाढविण्यापासून केली. याआधी मी ज्युनियर भारतीय शिबिरातही भाग घेतला नव्हता. मला थेट सिनियर स्तरावर खेळण्याची संधी मिळाली आहे. मला बेसिक्स भक्कम करावे लागतील याची जाणीव होती. मी बेसिक्सवर लक्ष देत उणिवा दूर केल्यामुळेच या स्तरावर पोहोचू शकलो.’ (वृत्तसंस्था)