पहिला दिवस धवल कुलकर्णीचा
By admin | Published: February 25, 2016 03:46 AM2016-02-25T03:46:13+5:302016-02-25T03:46:13+5:30
धवल कुलकर्णीच्या (३० धावांत ४ बळी) भेदक गोलंदाजीच्या बळावर दिवसअखेर मुंबईने सौराष्ट्राला ८ बाद १९२ धावांत रोखण्याची कामगिरी केली. अर्पित वासवदाने पाऊणशतकी
पुणे : धवल कुलकर्णीच्या (३० धावांत ४ बळी) भेदक गोलंदाजीच्या बळावर दिवसअखेर मुंबईने सौराष्ट्राला ८ बाद १९२ धावांत रोखण्याची कामगिरी केली. अर्पित वासवदाने पाऊणशतकी व प्रेरक मंकडने नाबाद अर्धशतकी खेळी करून संघाचा कोसळणारा डाव सावरला.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर बुधवारपासून रणजी चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यास सुरुवात झाली. मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवून सौराष्ट्रावर वर्चस्व मिळविले. धवल कुलकर्णीने सातव्या षटकात अवी बारोत याला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद करून पहिला झटका दिला. पुढच्या षटकात शार्दूल ठाकूरने दुसरा सलामीचा फलंदाज सागर जोगियानीला आदित्य तारे याच्याकरवी झेलबाद करून दुसरा झटका दिला. सौराष्ट्राची सलामीची जोडी २२ धावांवर परतली. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराला (४) कुलकर्णीने सूर्यकुमार यादवकडे झेल देण्यास भाग पाडून ३६ धावांवर तिसरा बळी टिपला. त्यानंतर आलेला शेल्डन जॅक्सन भोपळाही फोडू शकला नाही.
त्यानंतर ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेले. जयदेव शहा (१३), चिराग जैन (१३), दीपक पुनिया (६) हे झटपट बाद झाले. कुलकर्णी व शार्दूल ठाकूर यांनी पाठोपाठ धक्के दिले. अभिषेक नायर व बलविंदर संधू यांनीदेखील प्रत्येकी १ बळी घेऊन त्यांना साथ दिली. सौराष्ट्राचे ७ फलंदाज १०८ धावांतच तंबूत परतले. तर, संघाचा धावफलक शंभरीवर जाण्यासाठी ५०व्या षटकाची वाट पाहावी लागली.
अर्पित वासवदा व नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला प्रेरक मंकड यांनी संघाचा कोसळणारा डाव सावरला. वासवदाने ६ चौकारांच्या साह्याने २१४ चेंडूंत ७७ धावांची खेळी करून संघाचा डाव सावरला. वासवदा-मंकड ही जोडी जमलेली असताना कुलकर्णीने दिवसाच्या शेवटच्या षटकात वासवदाला यादवकडे झेल देण्यास भाग पाडून ही जोडी फोडली व संघाला आठवा धक्का दिला. प्रेरक मंकड ११९ चेंडूंत ५ चौकारांसह ५५ धावा फटकावून नाबाद राहिला.
(क्रीडा प्रतिनिधी)
धावफलक :
सौराष्ट्र पहिला डाव : ८४.४ षटकांत ८ बाद १९२, अवी बारोत १४, सागर जोगियानी ८, अर्पित वासवदा ७७, शेल्डन जॅक्सन ०, प्रेरक मंकड नाबाद ५५, धवल कुलकर्णी ४/३०, शार्दूल ठाकूर २/५९, अभिषेक नायर १/४२, बलविंदरसिंग संधू १/४१.