पहिला सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा

By admin | Published: February 23, 2017 01:15 AM2017-02-23T01:15:39+5:302017-02-23T05:50:18+5:30

आजपासून सुरू होत असलेल्या भारत - आॅस्टे्रलिया कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात वर्चस्व राखून हेच

The first match is important for both the teams | पहिला सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा

पहिला सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा

Next

आजपासून सुरू होत असलेल्या भारत - आॅस्टे्रलिया कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात वर्चस्व राखून हेच सातत्य उर्वरित मालिकेत कायम राखण्याचा प्रयत्न दोन्ही संघाचा असेल. नुकताच घरच्या मैदानावर झालेल्या न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिला  सामना अटीतटीचा झाला. भारताने हे दोन्ही सामने आपल्या बाजूने झुकविण्यात यश मिळवले. इंग्लंडविरुद्ध
पहिला सामना अनिर्णीत राखल्यानंतर उर्वरित सामन्यात एकहाती वर्चस्व राखत भारताने दबदबा राखला.  भारताने न्यूझीलंडला क्लीन स्वीप दिल्यानंतर, इंग्लंडला
४-० असे लोळवले आणि हेच वर्चस्व आॅस्टे्रलियाविरुध्दही कायम राखण्याचा भारतीयांचा प्रयत्न असेल. शिवाय, गेल्यावेळच्या भारत दौऱ्यात आॅस्टे्रलियाला ०-४ असा क्लीन स्वीप मिळाला होता आणि याची जाणीव आॅसी कर्णधार स्टीव्ह स्मिथला आहे.
आॅस्टे्रलियापुढे सर्वांत मोठे आव्हान असेल, ते भारतीय फिरकी गोलंदाजीचे. त्यामुळे आॅस्टे्रलियाचे फलंदाज कशाप्रकारे रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा यांचा सामना करतात याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी, आॅस्टे्रलियाचा संघ दिसतो तितका कमजोर संघ नाही.
गेल्या काही मालिकांमध्ये परदेशीभूमींवर नक्कीच त्यांची दाणादाण उडाली. श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध त्यांना पराभूत व्हावे लागले. मात्र, या सर्व कठीण काळातून आॅसी संघ आता सावरला असल्याचे माझे मत आहे. सध्या त्यांची फलंदाजी खूप खोलवर आहे. तसेच, त्यांचे फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. आॅसीचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांचा भारताला धोका आहेच. याशिवाय सराव सामन्यात शतक ठोकलेला शॉन मार्श तसेच
संधी मिळाली, तर उस्मान ख्वाजा यासह इतरही अनेक  गुणवान खेळाडू आॅस्टे्रलियाकडे आहेत. दुसरीकडे  भारताविषयी म्हणाल, तर संघाला सलामीच्या जोडीबाबत चिंतेचे वातावरण आहे. केएल राहुल आणि मुरली विजय  दोघेही चांगले फलंदाज आहेत. परंतु, दुखापतींचा सामना गेल्या काही मालिकांमध्ये भारताच्या सलामीवीरांना करावा लागत आहे.
त्याचवेळी, तुफान फॉर्ममध्ये असलेला कोहली आॅस्टे्रलियाची मुख्य अडचण ठरणार आहे. सध्या त्याचा सुरू असलेला धडाका आॅसी गोलंदाजांच्या मनात नक्कीच  धडकी भरवणारा आहे. त्याचप्रमाणे अजिंक्य रहाणे,  रिध्दिमान साहा यांची खेळीही भारतासाठी खूप फायदेशीर आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे आश्विन आणि  जडेजा दोघेही गोलंदाजीसह उत्कृष्ट फलंदाजीही करत असल्याने भारताची फलंदाजीही खोलवर आहे. त्यामुळेच मालिकेतील पहिला सामना नक्कीच अटीतटीचा होणार असल्याने या सामन्यातून मिळणारा आत्मविश्वास दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.

अयाझ मेमन
संपादकीय सल्लागार

Web Title: The first match is important for both the teams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.