सर्वप्रथम आॅलिम्पिक पात्रता गाठावी
By admin | Published: December 31, 2015 01:54 AM2015-12-31T01:54:34+5:302015-12-31T01:54:34+5:30
२०१२च्या आॅलिम्पिकमध्ये मिळालेले बॅडमिंटनमधील पदक हे माझ्यामते भारतीय बॅडमिंटनसाठी सर्वात मोठे यश होते. आता आगामी आॅलिम्पिकसाठी सर्वप्रथम पात्र ठरण्याचे लक्ष्य गाठावे
मुंबई : २०१२च्या आॅलिम्पिकमध्ये मिळालेले बॅडमिंटनमधील पदक हे माझ्यामते भारतीय बॅडमिंटनसाठी सर्वात मोठे यश होते. आता आगामी आॅलिम्पिकसाठी सर्वप्रथम पात्र ठरण्याचे लक्ष्य गाठावे आणि त्यानंतर पुढील तयारी करता येईल, असे भारताचे दिग्गज माजी बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपीचंद यांनी सांगितले.
२ जानेवारीपासून रंगणाऱ्या बॅडमिंटन लीग ‘पीबीएल’ स्पर्धेतील मुंबई रॉकेट्स संघाच्या लोगोचे अनावरण करताना गोपीचंद यांनी आपली प्रतिक्रीया दिली. या कार्यक्रमाला युवा खेळाडू आरएमव्ही गुसाईदत्त, भारताचा अनुभवी खेळाडू एच.एस. प्रणॉय आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या डेन्मार्कचा दुहेरीचा खेळाडू
मॅथीअस बोए यांची उपस्थिती होती. यावेळी गोपीचंद म्हणाले की, ओलिम्पिक तयारी विषयी म्हणायचे झाल्यास, सर्वप्रथम आपल्याला ‘स्टेप बाय स्टेप’ पुढे जाणे गरजेचे
आहे. आपल्या प्रमुख खेळाडूंनी आॅलिम्पिक पात्रता गाठणे
महत्त्वाचे असून ते आपले पहिले लक्ष्य आहे. जर का प्रमुख खेळाडू आॅलिम्पिकसाठी पात्र ठरल्यास नश्चितच यंदा भारताला बॅडमिंटनमध्ये पदकांची संधी असेल.
यंदाच्या पीबीएलमध्ये ट्रम्प सामना सर्वांचे लक्ष वेधून घेणार ठरेल. याविषयी गोपीचंद यांनी सांगितले की, स्पर्धेत हा प्रयोग निश्चित चांगला प्रयत्न आहे. यामुळे सामन्यात शेवटपर्यंत रोमांचकता राहिल. प्रत्येक संघाला आपल्या सामन्यातील पाच लढतींपुर्वी एक लढत ट्रम्प म्हणून घोषित करावी लागेल. सामन्याच्या दिड तास आधी प्रत्येक संघाला आपल्या रुपरेषेला अंतिम स्वरुप द्यावे लागेल. त्यावेळी त्या संघाला आपल्या ट्रम्प लढतीची माहिती द्यावी लागेल. ट्रम्प लढत जिंकल्यास त्या संघाला अतिरीक्त गुण मिळतील, तर हरल्यास एक गुण कमी होईल.