किंग पाँग संघ पहिला विजेता
By admin | Published: June 23, 2015 01:47 AM2015-06-23T01:47:13+5:302015-06-23T01:47:13+5:30
अखेरच्या लढतीपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात किंग पाँग संघाने झुंजार खेळाच्या जोरावर हाय टाइड संघाचा ५-४ असा पाडाव करून पहिल्या
मुंबई : अखेरच्या लढतीपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात किंग पाँग संघाने झुंजार खेळाच्या जोरावर हाय टाइड संघाचा ५-४ असा पाडाव करून पहिल्यावहिल्या मुंबई सुपर लीग टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि मुंबई उपनगर जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने खार जिमखाना येथे नुकतीच ही स्पर्धा पार पडली. विजयी संघाला माजी हॉकीपटू धनराज पिल्ले यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.
दिव्या महाजन आणि ओम्कार तोरगळकर यांनी आपआपल्या एकेरी सामन्यात सहज बाजी मारताना किंग पाँग संघाला ९ लढतींच्या या
सामन्यात २-० अशी भक्कम
आघाडी मिळवून दिली. मात्र तिसऱ्या लढतीत हाय टाइडच्या मंदार
हर्डिकरने अनपेक्षित निकाल लावताना अनुभवी मुनित दाणीचा ११-८,
८-११, ११-८, ६-११, १२-१० असा पराभव करून संघाची पिछाडी १-२ अशी कमी केली.
ओम्कार - दिव्या यांनी मिश्र दुहेरीमध्ये हर्ष मणियार - मृण्मयी म्हात्रे यांचा ३-१ असा पराभव करून किंग पाँगची आघाडी ३-१ अशी वाढवली. तर दक्षिण आशियाई सांघिक व वैयक्तिक सुवर्णपदक विजेत्या श्रुष्टी हेलंगडीने तन्विता ठाकूरचा ३-० असा फडशा पाडून हाय टाइडचे आव्हान जिवंत ठेवले.
शिवाय, यानंतर लगेच पुढील सामन्यात राजवीर शाहने हाय टाइडसाठी महत्त्वपूर्ण विजय मिळवताना समीहान कुलकर्णीचा ९-११, ११-८, ४-११, ११-५, ११-५ असा पराभव करून सामना ३-३ असा बरोबरीत आणला. ओम्कारने अनुभवी दीपक दुधाणेसोबत खेळताना योगेश देसाई - मणियार या जोडीला ११-९, ५-११, ८-११, १२-१०, ११-५ असे नमवून किंग पाँगला आघाडीवर नेले. तर मंदार - श्रुष्टी या कसलेल्या जोडीने मुदीत -तन्विता यांचा मिश्र दुहेरी लढतीत ९-११, ८-११, ११-९, ११-५, ११-३ असा झुंजार पराभव करून सामना ४-४ असा बरोबरीत आणला.
अखेरच्या निर्णायक वेटरन्स एकेरी लढतीत दीपक दुधाणेने अनुभवी योगेश देसाई विरुद्ध पाच सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत ११-३, ११-१३, ११-९, १०-१२, ११-५ असा विजय मिळवला आणि किंग पाँग संघाच्या विजेतेपदावर शिकामोर्तब केले. (क्रीडा प्रतिनिधी)