अनमोल खरबसह पाच भारतीय बॅटमिंटनपटू उपांत्यपूर्व फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 05:54 AM2024-04-05T05:54:36+5:302024-04-05T05:57:37+5:30
Anmol Kharb News: युवा बॅटमिंटनपटू अनमोल खरब हिच्यासह पाच भारतीय खेळाडू कझाखस्तान आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत.
अस्ताना - युवा बॅटमिंटनपटू अनमोल खरब हिच्यासह पाच भारतीय खेळाडू कझाखस्तान आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. अनमोल हिच्याशिवाय देविका सिहाब, राष्ट्रीय विजेती अनुपमा उपाध्याय, सातवी मानांकित तान्या हेमंत आणि इशाराणी बरूआ यांनी महिला एकेरीत अंतिम आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.
गत राष्ट्रीय विजेती अनमोलने यूएईच्या नूरानी राजू अजाहरा हिला दुसऱ्या फेरीत २१-११, २१-७ असे पराभूत केले. आता तिचा सामना जपानच्या सोरानो योशिकावा हिच्याशी होणार आहे. यंदा चार अंतिम फेऱ्यांमध्ये पोहोचून दोन आंतरराष्ट्रीय किताब जिंकणाऱ्या सिहागने अझरबैजानच्या केइशा फातिमा अहाजरा हिला २१-१२, २१-१२ असे नमविले. आता तिच्यासमोर अनुपमाचे आव्हान असेल. अनुपमाने चेक प्रजासत्ताकच्या टेरेजा एस. हिला पराभूत केले आहे. सातव्या मानांकित तान्याने इस्रायलच्या सोनिया पोलिकारपोवा हिला २१-११, २१-१८ असे पराभूत केले. आता ती आपली देश सहकारी इशाराणीविरुद्ध खेळणार आहे. इशाराणीने न्यूझीलंडच्या टिफानी होलाला पराभूत केले.
मिश्र दुहेरीत रोहन कपूर आणि रुत्विजा गाडे, अभ्युदय चौधरी आणि वैष्णवी खाडकेकर, संजय श्रीवत्स आणि मनीषा के, अलिशा खान आणि झाकुओ सेयी यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.