पुन्हा फिक्सिंगचे सावट

By admin | Published: April 11, 2015 04:39 AM2015-04-11T04:39:50+5:302015-04-11T04:39:50+5:30

आयपीएल क्रिकेटवर पुन्हा एकदा फिक्सिंगचे सावट आले असून, राजस्थान रॉयल्सच्या एका खेळाडूने मागच्या महिन्यात स्पॉट फिक्सिंगसाठी आपल्याशी संपर्क झाल्याचा खुलासा केला आहे

Fixing again | पुन्हा फिक्सिंगचे सावट

पुन्हा फिक्सिंगचे सावट

Next

नवी दिल्ली : आयपीएल क्रिकेटवर पुन्हा एकदा फिक्सिंगचे सावट आले असून, राजस्थान रॉयल्सच्या एका खेळाडूने मागच्या महिन्यात स्पॉट फिक्सिंगसाठी आपल्याशी संपर्क झाल्याचा खुलासा केला आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे केलेल्या तक्रारीत या खेळाडूने आपल्याला पैशाचे आमिष दाखविल्याचे म्हटले असल्याचे समजते.
बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनीही या वृत्तास दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘‘एका खेळाडूसोबत सट्टेबाजांनी संपर्क साधला. त्याला पैशाचे आमिष दाखविण्याचा प्रयत्न झाला. यावरून खेळाडूंना जागरूक करण्याचे बीसीसीआयचे प्रयत्न फळाला आले, हे सिद्ध होत आहे.’’ ज्या खेळाडूशी संपर्क साधण्यात आला, तो मुंबईचा असल्याचे समजते. त्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. राजस्थान रॉयल्स संघात मुंबईचे अजिंक्य रहाणे, प्रवीण तांबे, दिनेश साळुंके, धवल कुलकर्णी आणि अभिषेक नायर या पाच जणांचा समावेश आहे.
राजस्थान रॉयल्स संघ २०१३मध्येदेखील स्पॉट फिक्सिंगमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनानेदेखील खेळाडूशी संपर्क झाल्याची कबुली देऊन फिक्सिंगपासून वाचविण्याचे सर्वतोपरी उपाय शोधले जातील, असे स्पष्ट केले. राजस्थान रॉयल्सचे सीईओ रघू अय्यर म्हणाले, ‘‘एक महिना आधी राजस्थान रॉयल्सच्या एका खेळाडूशी आयपीएलमध्ये खेळत नसलेल्या एका खेळाडूने २०१५च्या सामन्यांबद्दल संपर्क साधला होता.
आमच्या खेळाडूने ताबडतोब संघव्यवस्थापनाला ही माहिती पुरवली. आम्ही ती बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे सोपविली. घटनेची ताबडतोब माहिती दिल्याबद्दल त्या खेळाडूच्या प्रामाणिक प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो. बीसीसीआय यावर कठोर पावले उचलेल, अशी आशा आहे. या घटनेमुळे खेळाडू सावध असतील तर खेळातील घाण दूर ठेवणे शक्य आहे, हे सिद्ध होते.’’
वृत्तानुसार, राजस्थान संघातील मुंबईच्या खेळाडूशी त्याच्या रणजी सामन्यातील साथीदाराने संपर्क साधून स्पॉट फिक्सिंगचा प्रयत्न केला. मोबदल्यात पैशाचे आमिष दाखवले होते. सुरुवातीला या खेळाडूने गंमत समजून टाळाटाळ केली; पण नंतर बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे हे प्रकरण सोपविले.
या घटनेमुळे २०१३च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंगला उजाळा मिळाला आहे. त्या वेळी एस. श्रीसंतसह राजस्थान रॉयल्सच्या
तीन खेळाडूंना अटक करण्यात
आली होती. स्पॉट फिक्सिंगमुळेच
एन. श्रीनिवासन यांनाही बीसीसीआयचे अध्यक्षपद गमवावे लागले. त्यांचे जावई गुरुनाथ मयप्पनलाही सट्टेबाजीत दोषी धरण्यात आले. राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा याची सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू आहे. कुंद्रा याने राजस्थान फ्रँचायसीतील स्वत:चे शेअर विकायला काढले आहेत.
(वृत्तसंस्था)



> स्पॉट फिक्सिंगसाठी राजस्थान रॉयल्स संघातील मुंबईच्या एका खेळाडूसोबत संपर्क करण्यात आल्याचा खुलासा होताच खडबडून जागे झालेले आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांनी या टी-२० लीगला भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी ठेवण्याचा पुनरुच्चार केला आहे. शुक्ला म्हणाले, ‘‘जो खुलासा झाला, त्याची चौकशी करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या प्रसंगांवर तोडगा काढण्यासाठी सर्वच संघांकडे भ्रष्टाचारविरोधी तसेच सुरक्षा पथके आहेत.’’ त्या खेळाडूंची ओळख पटविण्यास नकार देत शुक्ला पुढे म्हणाले, ‘‘बीसीसीआयने स्पॉट फिक्सिंगसारख्या प्रकारापासून खेळाडूंना दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना केली होती. त्याचा हा सकारात्मक परिणाम आहे. खेळाडू स्वत: माहिती देत आहेत. भ्रष्टाचार पथक संचालन परिषदेला माहिती पुरवत नाही. स्वतंत्र काम करीत असल्याने खेळाडूची माहिती मीडियाला देता येणार नाही. या स्पर्धेत भ्रष्टाचाराला थारा नको, याची काळजी घेणे आमच्या हातात आहे. खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांनी अधिक सावध राहावे.’’

Web Title: Fixing again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.