फिक्सिंगचा खेळ खल्लास

By admin | Published: July 15, 2015 02:56 AM2015-07-15T02:56:06+5:302015-07-16T08:46:06+5:30

निवृत्त सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांच्या समितीने आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीसंबंधित चौकशीचा अहवाल मंगळवारी जारी करताच

Fixing game | फिक्सिंगचा खेळ खल्लास

फिक्सिंगचा खेळ खल्लास

Next

नवी दिल्ली : निवृत्त सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांच्या समितीने आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीसंबंधित चौकशीचा अहवाल मंगळवारी जारी करताच आयपीएलच्या तंबूत अनिश्चिततेचे वादळ शिरले. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या या समितीने गुरुनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा यांच्यावर आजन्म बंदी घातली असून, त्यांची मालकी असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांना आयपीएलमधून दोन वर्षांसाठी बाद केले आहे. या निर्णयाने दोन संघ कमी झाल्याने त्यातील खेळाडूंसाठी नव्या संघांचा पर्याय आणि आयपीएलची एकूणच रचना घुसळून निघणार आहे. अर्थात क्रिकेटवरील विश्वासाचा खेळ खल्लास करणाऱ्या फिक्सिंगची या निर्णयाने हिट विकेट गेली.
न्या. लोढा यांच्या नेतृत्वाखालील समितीने आज भरगच्च पत्रकार परिषदेत हा निकाल सुनावला. लोढा समिती या दोन्ही संघांवर बंदी घालणार की मोठा आर्थिक दंड ठोठावणार, याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना होती.
२०१३च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मयप्पन आणि कुंद्रा यांना सट्टेबाजीप्रकरणी दोषी ठरविले होते. त्यानंतर या दोघांसह त्यांच्या संघांना काय शिक्षा द्यायची, यासाठी न्या. लोढा यांच्या नेतृत्वात तीनसदस्यीय समिती नेमली. वर्षभर चौकशी केल्यानंतर लोढा समितीने मंगळवारी निकाल दिला. या समितीत लोढा यांच्यासह न्या. अशोक भान आणि न्या. आर. रवींद्रन यांचा समावेश होता. बीसीसीआय आणि आयपीएल नियमानुसार संघांचे मालक किंवा अधिकारी गैरप्रकारात दोषी आढळत असतील तर त्या संघाला बाद करण्याची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर समितीने दोन्ही संघांवर दोन वर्षांची बंदी घातली. ही शिक्षा तातडीने लागू झाली आहे.

अनुत्तरित प्रश्न
1) आयपीएलचे कसे होणार?
2) ‘टॉपप्लेअर’कोणत्या संघात खेळणार?
3)दोन्ही संघांतील खेळाडूंच्या पैशाचे काय?
4)बीसीसीआय नव्या संघांचा शोध घेणार का?
4)पुणे, कोच्ची संघांना संधी मिळणार का?

न्या. लोढा म्हणाले...
‘‘मयप्पन सट्टेबाजीत गुंतला होता. नियमितपणे तो आयपीएलवर सट्टा लावायचा. त्याने ६० लाख रुपये गमावले. त्याने कमाई मात्र केली नाही, हे त्याचे दुर्दैव! तो ४० वर्षांचा आहे. या खेळावर त्याचे प्रेम आहे, हे मनाला पटण्यासारखे नाहीच.’’

निकालातील ताशेरे
गुरुनाथ मय्यपन याला कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांच्या प्रक्रियेसाठी आजीवन निलंबन
मय्यपनला पाच वर्षांसाठी कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमधील भागीदारीसाठी अयोग्य घोषित
मय्यपनच्या सट्टेबाजीमुळे खेळाची, बीसीसीआय व आयपीएलची
बदनामी झाली
राजस्थान रॉयल्सच्या राज कुंद्रांनाही अशीच शिक्षा ठोठावली

दोन संघ दोन वर्षांसाठी निलंबित
चेन्नई सुपरकिंग्जची
मालकी असलेल्या इंडिया सिमेंट्सचे आयपीएलमधून
२ वर्षांसाठी निलंबन.
राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपरकिंग्जचे संघ दोन वर्षांसाठी निलंबित, कारवाई तत्काळ लागू

चेन्नई आणि राजस्थान या दोन्ही संघांमधील खेळाडूंना अन्य संघांत सामावून घेणे शक्य होणार नाही. कारण तसे केल्यास पुन्हा उरलेल्या सहा संघांमध्ये प्रस्थापित खेळाडूंचाच भरणा होईल. म्हणजेच उदयोन्मुख खेळाडू या व्यासपीठापासून वंचित होतील. या परिस्थितीत दोन प्रमुुख शक्यता संभवतात....

आव्हान फक्त सुप्रीम कोर्टात
न्या. लोढा समितीचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मानला जाईल. त्यामुळे याविरोधात कोणाला तक्रार करावयाची असल्यास ती फक्त सर्वोच्च न्यायालयातच करता येणार आहे.

महेंद्रसिंग धोनीविना आयपीएल ही कल्पनाच करवत नाही. मुळात आठ संघांचा विचार करून आखलेल्या ढाच्यात दोन संघांची भर टाकण्याचा प्रयत्न झाला. प्रत्यक्षात आता दोन संघ कमी झाले आहेत. सहा संघांच्या बळावर हा ढाचा टिकेल का, याचा विचार अपरिहार्य बनला आहे. - सुनील गावसकर

Web Title: Fixing game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.