'चढउतार आयुष्याचा भाग, पुढे जाण्याआधी ‘रेड सिग्नल’वर थांबलेले बरे'' : सुशील कुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:56 AM2017-11-17T00:56:03+5:302017-11-17T00:56:14+5:30
तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर मॅटवर पुनरागमन करणारा आॅलिम्पिकचे दुहेरी पदक विजेता मल्ल सुशील कुमार राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या पूर्वसंध्येला मनातील बोलला.
इंदूर : तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर मॅटवर पुनरागमन करणारा आॅलिम्पिकचे दुहेरी पदक विजेता मल्ल सुशील कुमार राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या पूर्वसंध्येला मनातील बोलला. ‘चढउतार आयुष्याचा भाग असून, पुढे जाण्याआधी रेड सिग्नलवर थांबून प्रतीक्षा करणेदेखील गरजेचे असते,’ असे सुशीलचे मत पडले.
गुरू महाबली सतपाल यांचा आदेश मिळताच मॅटवर परतल्याचे सांगून सुशील म्हणाला, ‘माणूस पुढे जातो तेव्हा त्याला चढउताराचा सामना देखील करावा लागतो. तीन वर्षांनंतर मॅटवर परतताना युवा मल्लासारखा अनुभव घेत आहे. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत खेळताना मल्ल नवखा असो वा अनुभवी, सर्वांना स्फूर्ती लाभतेच.’
भारताला दोनदा आॅलिम्पिक पदक मिळवून देणाºया ३४ वर्षांच्या सुशीलला गेल्या काही वर्षांत बºयाच चढउतारांचा सामना करावा लागला. यासंदर्भात विचारताच तो म्हणाला, ‘यशाची पायरी चढण्याआधी ठेच लागली तर माणूस सावरतो. पुढे जाण्याआधी रेड सिग्नलवर थांबलेले बरे. पुढे कसे जायचे याचा विचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. आयुष्यात यश मिळवायचे झाल्यास हाच मंत्र लक्षात ठेवावा लागेल.
७४ किलो गटात सुशील रेल्वेतर्फे आज शुक्रवारी मॅटवर उतरणार आहे. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांविषयी विचारताच तो म्हणाला, ‘सध्यातरी मी राष्ट्रीय स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे पुन्हा एकदा देशाचे प्रतिनिधित्व करू शकेन, असा विश्वास वाटतो.’
सुशीलने अखेरची कुस्ती २०१४ च्या ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत खेळली होती. त्या वेळी त्याने सुवर्ण जिंकले. २०१६ च्या रिओ आॅलिम्पिकमध्ये मात्र त्याला सहभागी होता आले नाही. रेसलिंग फेडरेशन आॅफ इंडियाने रिओ आॅलिम्पिकमध्ये ७४ किलो गटात भारताचे प्रतिनिधित्व कोण करेल यासाठी आधी नरसिंग यादव आणि सुशील यांच्यात निवड चाचणी घेण्याचे ठरविले होते; पण ऐनवेळी शब्द फिरविल्याने सुशीलने न्यायालयात
धाव घेतली. दिल्ली उच्च न्यायालयाने चाचणीची सुशीलची मागणी फेटाळली होती. (वृत्तसंस्था)
सुशील कुमारने पुनरागमनाचा घेतलेला निर्णय पाहून मला खूप आनंद झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची अट सुशील कुमारसाठी अनिवार्य नसेल. आणि आम्ही कोणत्याही खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची अट घालणार नाही. दुखापत किंवा वैयक्तिक कारणामुळे कोणीही राष्ट्रीय स्पर्धेपासून दूर राहू शकतो.
- ब्रिजभूषण शरण सिंग, अध्यक्ष, भारतीय कुस्ती महासंघ (डब्ल्यूएफआय)