भारताची फ्लाईंग राणी !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 07:26 PM2018-07-13T19:26:52+5:302018-07-13T19:27:13+5:30
फुटबॉल विश्वचषक आणि भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा या हायव्होल्टेज स्पर्धा सुरू असतानाही 19 वर्षीय हिमा दासने संपूर्ण देशवासियांचे लक्ष वेधले.
फुटबॉल विश्वचषक आणि भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा या हायव्होल्टेज स्पर्धा सुरू असतानाही 19 वर्षीय हिमा दासने संपूर्ण देशवासियांचे लक्ष वेधले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. त्यामुळे तिला भारताची फ्लाईंग राणी म्हणून संबोधले जात आहे.
भारताच्या हिमा दासने अॅथलेटीक्स स्पर्धेत इतिहास रचला आहे. जागतिक अॅथएलेटीक्स स्पर्धेच्या 20 वर्षांखालील 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत हिमाने सुवर्णपदक पटकावले आहे.
हिमा दासने भारताला जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत ट्रॅक अँड फिल्डमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. फिनलँड येथे सुरू असलेल्या 20 वर्षांखालील मुला/मुलींसाठीच्या या स्पर्धेत हिमाने 400 मीटर स्पर्धेत बाजी मारून इतिहास घडवला.
रॅटिना स्टेडियमवर झालेल्या लढतीत हिमाने 51.46 सेकंदाची वेळ नोंदवून प्रतिस्पर्धी धावपटूंना मागे टाकले. यासह या स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. यापूर्वी 2016 मध्ये नीरज चोप्राने भालाफेकीत विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. पण ट्रॅक प्रकारात सुवर्ण जिंकणारी हिमा ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली.
जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत याआधी थाळीफेकपटू सीमा पूनिया (2002 मध्ये कांस्यपदक ) आणि थाळीफेकपटू नवजीत कौर ढिल्लोने ( 2014 मध्ये कांस्यपदक ) यांनी पदक जिंकले आहेत.
हिमाच्या आधी मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताकडून सर्वोत्तम कामगिरी केलेली होती. पीटी उषाने 1984च्या ऑलिम्पिक स्पर्धेत 400मीटर अडथळ्याच्या शर्यतीत चौथ्या स्थानापर्यंत मुसंडी मारली होती.
मिल्खा सिंहने 1960च्या ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर स्पर्धेत चौथे स्थान पटकावले होते. या दोघांव्यतिरिक्त एकाही भारतीय खेळाडूला पदकाजवळ जाता आलेले नाही.