Milkha Singh: ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांचे निधन; कोरोना पश्चात लढाई हरले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 07:08 AM2021-06-19T07:08:25+5:302021-06-19T07:08:38+5:30
Milkha Singh passed away: पद्मश्री मिल्खा सिंग यांनी वयाच्या ९१व्या वर्षी शुक्रवारी रात्री ११.३०च्या सुमारास रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा आणि भारताचा स्टार गोल्फर जीव मिल्खा सिंग व तीन मुली असा परिवार आहे.
चंदीगड : भारताचे माजी दिग्गज धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांचे कोरोनामुळे शुक्रवारी रात्री निधन झाले. एक महिन्यापासून त्यांचा कोरोनाविरुद्ध लढा सुरू होता. मिल्खा सिंग यांच्या पत्नी व भारताच्या व्हॉलिबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौर यांनी कोरोना संक्रमणामुळे पाच दिवसांपूर्वी अखेरचा श्वास घेतला होता. (Legendary sprinter Milkha Singh died on Friday due to post-Covid complications at the age of 91.)
पद्मश्री मिल्खा सिंग यांनी वयाच्या ९१व्या वर्षी शुक्रवारी रात्री ११.३०च्या सुमारास रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा आणि भारताचा स्टार गोल्फर जीव मिल्खा सिंग व तीन मुली असा परिवार आहे. शुक्रवारी संध्याकाळपासूनच त्यांची प्रकृती खालावली होती. ऑक्सिजनची पातळीही खूप कमी झाली होती. गेल्याच महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मिल्खा यांची कोरोना चाचणी बुधवारी निगेटिव्ह आली होती.
मिल्खा सिंग यांनी चार वेळा आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावले असून १९५८ सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्ण कामगिरी केली होती. १९६० सालच्या रोम ऑलिम्पिकमध्ये काही शतांशच्या फरकाने त्यांचे कांस्य पदक हुकले होते. १९५९ साली मिल्खा सिंग यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. (वृत्तसंस्था)