फ्लायवेट विरुद्ध हेविवेट
By Admin | Published: June 6, 2017 05:04 AM2017-06-06T05:04:34+5:302017-06-06T05:04:34+5:30
चॅम्पियन्स चषकातील भारत वि. पाकिस्तान सामन्यापूर्वी खूपच उत्सुकता निर्माण केली गेली
- अयाझ मेमन
चॅम्पियन्स चषकातील भारत वि. पाकिस्तान सामन्यापूर्वी खूपच उत्सुकता निर्माण केली गेली होती. दोन्ही संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. दोन्हींच्या लढतींचा इतिहास मोठा आहे. आकडेवारी रंजक आहे. त्यामुळे हा सामनाही मोठ्या ईर्ष्येने खेळला जाणार असे वाटत होते; परंतु प्रत्यक्षात सामना खूपच एकतर्फी झाला, पण हे अनपेक्षित नव्हते. यापूर्वीही मी म्हटले होते की, दोन्ही संघांत अंतर खूपच मोठे आहे. गुणवत्ता असो किंवा अलीकडील काळातील कामगिरी असो, दोन्ही संघांत कोणतीच तुलना होऊ शकत नव्हती. भारत खूपच बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो, तर पाकिस्तान त्यामानाने खूपच दुबळा संघ भासतो. रविवारच्या सामन्यातून हेच सिद्ध झाले. खूपच एकतर्फी लढत झाली. जर बॉक्सिंगच्या भाषेत सांगायचे झाल्यास फ्लायवेट विरुद्ध हेविवेट अशी ही लढत झाली. या सामन्यात कोण जिंकणार हा प्रश्नच कधी पडला नाही. प्रश्न असा पडला की, भारत किती अंतराने जिंकणार? एकदिवसीय सामन्यात १२४ धावांचे अंतर खूप मोठे मानले जाते. आतापर्यंतची एकूण आकडेवारी पाहिली तर पाकिस्तानची सरशी दिसते; परंतु अलीकडील काळातील आकडेवारी संपूर्ण त्यांच्या विरोधात दिसून येईल. भारताविरुद्ध आम्ही त्वेषाने लढून जिंकू ही पाकिस्तानी संघाची धारणा आता बदलण्याची वेळ आली आहे. कारण तुमच्याकडे जिंकण्यासाठी गुणवत्ता नाही, जोशपूर्ण उगवते युवा खेळाडू असले पाहिजेत, त्याचप्रमाणे संघात अनुभवी खेळाडूंही पाहिजेत. एकूणच संघ सर्वच पातळीवर परिपूर्ण असला पाहिजे. केवळ उन्माद दाखवून सामना जिंकता येत नाही.
पाकिस्तान संघाचा दर्जा सध्या खालावला आहे. त्यांनी कमजोर कामगिरी केली असली तरी भारतीय संघाला विजयाचे श्रेय दिलेच पाहिजे. सामन्यापूर्वी भारतीय संघाबाबत अनेक प्रश्न उठवण्यात आले होते, जे ‘आयपीएल’मधील कामगिरीवर आधारित होते. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे भारतीय संघाने आपल्या कामगिरीने दिली आहेत. भारताची सलामी जोडी चालेल का? रोहित शर्माचा फॉर्म आहे का? युवराजची निवड का केली? त्याला खेळवणार का? खेळवणार असतील तर का खेळवणार? असे प्रश्न संघाच्या फलंदाजीसंदर्भात उठले होते. त्या सर्वांची चोख उत्तरे मिळाली. रोहित शर्माने सुंदर खेळी केली. शिखर धवनसोबत त्याने चांगली पायाभरणी केली. त्यामुळे पुढील फलंदाजांना मनसोक्त फलंदाजी करता आली. युवराज सिंगनेही जबरदस्त खेळी केली. विराट-रोहित खेळत असताना भारताची धावगती एकदम कमी झाली होती. पाकिस्तानी गोलंदाजांनी आपला फास आवळण्यास सुरुवात केली होती. याचवेळी युवराजने आपल्या अनुभवाचा फायदा घेत पाकिस्तानी गोलंदाजीवर घणाघात केला. तेथून सामना भारताच्या बाजूने वळला तो कायमचाच. म्हणूनच त्याला ‘सामनावीर’चा पुरस्कार देण्यात आला. तो आणि विराट सुरुवातीला काहीवेळ चाचपडत आहेत असे वाटले; परंतु नंतर त्यांनी जी फलंदाजी केली, त्याला तोड नाही. हार्दिक पांड्याने युवा खेळाडूंमधील टॅलेंट दाखवून देताना फिनिशिंग कसे असावे याचा परिपाठ घालून दिला. धोनी, जडेजा, केदार यांना फलंदाजी करण्याची वेळ आलीच नाही. यातून भारतीय फलंदाजी किती मजबूत आहे हे सिद्ध झाले.
गोलंदाजीतही जडेजा, भुवनेश्वर, उमेश, बुमराह यांनी आपआपल्या परीने योगदान दिले. जडेजाचे कौतुक करायला हवे. कारण त्याने गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणात आपली चमक दाखवून दिलीे. एकूणच सांघिक कामगिरीच्या जोरावर हा विजय मिळाला.
जाता-जाता एक इशारा : विजयाची हवा डोक्यात जाऊ देता कामा नये. कारण आता फक्त एकच सामना जिंकलाय. अजून स्पर्धा जिंकलेली नाही. आता एक पाऊल टाकले आहे. पुढची वाटचाल आणखी दमदारपणे करायची आहे.
( लेखक संपादकीय सल्लागार आहेत)