विश्वचषकासाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर भर
By admin | Published: November 11, 2016 12:57 AM2016-11-11T00:57:36+5:302016-11-11T00:57:36+5:30
पुढील वर्षी भारतात होणाऱ्या १७ वर्षे गटाच्या फिफा फुटबॉल विश्वचषकासाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर बारीक लक्ष असल्याचे अ. भा. फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ)अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : पुढील वर्षी भारतात होणाऱ्या १७ वर्षे गटाच्या फिफा फुटबॉल विश्वचषकासाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर बारीक लक्ष असल्याचे अ. भा. फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ)अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.
देशात फुटबॉलच्या विकासासाठी आता आम्ही योग्य दिशेने वाटचाल करीत असल्याचे सांगून खा. पटेल पुढे म्हणाले, की पायाभूत सुविधांच्या उभारणीसोबतच विश्वचषकाच्या तयारीचा वारंवार आढावा घेतला जात आहे. ज्या पायाभूत सुविधा उभारायच्या आहेत, त्या वेळेच्या आत पूर्ण होतील याची खबरदारी म्हणून आम्ही वारंवार बारकाईने लक्ष ठेवून आहोत. व्यापक स्तरावर सुविधा उपलब्ध कशा होतील, यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.
भारताचा माजी कर्णधार बायचुंग भूतिया याने अलीकडे भाष्य करताना देशात फुटबॉलच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुधारणांच्या उभारणीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली होती. यावर पटेल यांचे मत जाणून घेतले असता ते म्हणाले, की एआयएफएफने यंदा आयोजित केलेल्या १६ वर्षांखालील यूथ लीगमध्ये अनेक संघांचा सहभाग होता. अधिकाधिक खेळाडूंचा सहभाग असणे म्हणजे पुढील वर्षीच्या १७ वर्षे गटाच्या विश्वचषकासाठी भारतीय संघाला अनेक पर्याय उपलब्ध असणे, असा आहे. पायाभूत स्तरावर सुधारणांची गरज असल्याचे जेव्हा बोलतो तेव्हा कुठलाही शॉर्टकट नको. शॉर्टकटमुळे देशात फुटबॉलचा विकास होणार नाही. त्यासाठी बाल्यावस्थेपासून टॅलेंट शोधून त्यांच्यावर मेहनत घ्यावी लागेल. १६ वर्षे गटाची लीग हा उत्तम पर्याय आहे. यातून देशासाठी १२-१३ वर्षे खेळणारे प्रतिभावान खेळाडू तयार होऊ शकतील, असा मला विश्वास वाटतो. (वृत्तसंस्था)