यशस्वी कर्णधार होण्यावर भर देणार
By admin | Published: August 25, 2016 04:32 AM2016-08-25T04:32:29+5:302016-08-25T04:32:29+5:30
कर्णधार कार्लोस ब्रेथवेट याने संघाचे नेतृत्व भूषवताना कोणतीही अडचण येणार नाही आणि आपण पहिले खेळाडू व नंतर कर्णधार असल्याचे म्हटले आहे.
पोर्ट आॅफ स्पेन : वेस्ट इंडीजचा टी२० संघाचा नवनियुक्त कर्णधार कार्लोस ब्रेथवेट याने संघाचे नेतृत्व भूषवताना कोणतीही अडचण येणार नाही आणि आपण पहिले खेळाडू व नंतर कर्णधार असल्याचे म्हटले आहे.
भारताविरुद्ध २७ आणि २८ आॅगस्ट रोजी अमेरिकेत होणाऱ्या दोन टी-२0 मालिकेत ब्रेथवेट वेस्ट इंडीज संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. त्याला डॅरेन सॅमीच्या स्थानी कर्णधार नियुक्त करण्यात आले आहे. आपल्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीजला दोनदा वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या सॅमीला त्याने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले.
ब्रेथवेट म्हणाला, ‘संघाचे नेतृत्व करणे सोपे ठरेल असे मला वाटते. सर्वच खेळाडूंचे आपसातील संबंध खूप चांगले आहेत आणि ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंदरम्यान खूप मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मी आपल्या कर्णधारपदाला जास्त महत्त्व देत नाही. कारण माझ्या मते मी प्रथम खेळाडू आहे आणि नंतर कर्णधार. डॅनने जेथून संघाचे नेतृत्व सोडले होते तेथूनच मी संघाला पुढे घेऊन जाऊ इच्छितो.’
भारतात यावर्षी झालेल्या टी-२0 वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध अखेरच्या चार चेंडूंत चार षटकार मारत संंघाला दुसऱ्यांदा टी-२0 चॅम्पियन बनवून देण्यात योगदान दिल्यानंतर ब्रेथवेट खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला होता. तसेच त्याच वेळेस त्याने संघाचे नेतृत्व भूषवू शकतो हेदेखील सिद्ध केले होते. (वृत्तसंस्था)
>अमेरिकेसाठी उत्सुक
२८ वर्षीय ब्रेथवेट म्हणाला, ‘कर्णधार बदलल्याने कामगिरीवर काही फरक पडेल, असे वाटत नाही. संघातील सर्वच खेळाडू परिपक्व आहेत. माझ्या नेतृत्वाखालील संघाला विजय मिळवून देणे याला सर्वात आधी माझी प्राथिमकता असेल. आम्हाला भारताविरुद्ध वेगळ्या व्यूहरचनेनुसार खेळावे लागेल. अमेरिकेत होणाऱ्या सामन्याविषयी आम्ही खूप उत्सुक आहोत. येथे आमचे खूप पाठीराखे आहेत.