आर्सेनालविरुद्धच्या सामन्यावर लक्ष केंद्रित
By admin | Published: April 2, 2017 02:08 AM2017-04-02T02:08:12+5:302017-04-02T02:08:12+5:30
आयव्हरी कोस्टा या देशाचा कर्णधार असलेला आणि मँचेस्टर सिटीचा मिडफिल्डर याया टौरे हा सध्या एफ. ए. कप स्पर्धेतील आर्सेनालविरुद्ध होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याची तयारी करीत आहे
- याया टौरेशी केलेली बातचित
आयव्हरी कोस्टा या देशाचा कर्णधार असलेला आणि मँचेस्टर सिटीचा मिडफिल्डर याया टौरे हा सध्या एफ. ए. कप स्पर्धेतील आर्सेनालविरुद्ध होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याची तयारी करीत आहे. वेम्बले येथे २३ एप्रिल रोजी हे दोन्ही संघ आमने-सामने येतील. त्या पार्श्वभूमीवर याया टौरे याच्याशी केलेली बातचित.
प्रीमिअर लीगचे विजेतेपद मिळवणे आता मँचेस्टर सिटीसाठी कठीण वाटत आहे. मोनॅकोविरुद्ध हरल्यानंतर चॅम्पियन्स लीगचे विजेतेपदही दूर गेले आहे, आता या वर्षात मिळवण्यासारखे तुमच्या संघाकडे कोणती गोष्ट आहे, असे तुला वाटते?
वर्षाचा शेवट दमदारपणे आणि लढावूपणे करण्याचा आमचा मानस आहे. चॅम्पियन्स लीगमध्ये टॉप फोरमध्ये स्थान मिळवून आमच्या चाहत्यांना पुढील वर्षातील चांगल्या कामगिरीचा आत्ताच भरवसा द्यायचा आहे.
याचा अर्थ लीगमध्ये तुम्ही चेल्साला मागे टाकण्याचे स्वप्न सोडून दिले असा होतो काय?
नाही, आम्ही कधीही बाजी सोडून देणार नाही. आम्ही लढत राहूच. एफ. ए. कपच्या सेमीफायनलमध्ये आम्ही आहोतच, तीसुद्धा मोठी स्पर्धा आहे.
लीगमध्येही तुम्हाला अर्सेनालसोबत खेळावे लागणार आहे, मग एफ. ए. चषकातीलच सामना इतका महत्त्वाचा का वाटतो?
प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. या सत्रात आम्ही होम ग्राउंडपेक्षा प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर चांगली कामगिरी केली आहे. आमची संघ बांधणी उत्कृष्ट आहे.
सध्याची गुणतालिका पाहता चेल्साला कोणी पछाडू शकणार नाही असे तुला वाटते काय?
आम्ही चेल्सापेक्षा खूपच पिछाडीवर आहे, याची आम्हाला जाणीव आहे. सध्या ते ज्या पद्धतीने खेळत आहेत ते पाहता त्यांचे स्थान हिसकावून घेणे मुश्कील आहे. पण, म्हणून कोण त्यांचा पाठलाग सोडून देणार नाही. सगळे सर्वोच्च स्थान मिळवण्यासाठीच खेळत असतात. सत्राच्या शेवटपर्यंत कामगिरीत सातत्य ठेवून विजयी समारोप करण्याचे आमचे लक्ष्य आहे.
पुढच्या सत्रात मँचेस्टर सिटी हा तुल्यबळ संघ असेल आणि प्रीमिअर लीग आणि चॅम्पियन्स लीग या दोन्ही स्पर्धेत तो आव्हान निर्माण करू शकेल असे तुला वाटते का?
होय, तशी आशा करायला हरकत नाही!, संघाचे विद्यमान मॅनेजर पेप गौरडिओला यांच्या मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल योग्य होत आहे. भविष्यात आमचा संघ आणखी मजबूत होईल. टप्प्या-टप्प्याने संघ बांधणीची प्रक्रिया सुरू आहे. आता मागे वळून पाहायचे नाही, सदैव सैनिका पुढेच जायचे, हीच आमची भूमिका आहे.
यंदाच्या सत्रात एक तरी चषक जिंकण्याचा इरादा आहे का?
सध्या आमच्यापुढे एफ. ए. चषक जिंकण्याचे टार्गेट आहे. या संघात मी दीर्घकाळापासून खेळत आहे, आमच्यासाठी विजेतेपदाची काय किंमत आहे हे मला माहीत आहे.
सत्राच्या शेवटी चांगला खेळ करायचा की फक्त चषक जिंकायचा यापैकी तू कशाला प्राधान्य देशील?
अर्थातच, चांगला खेळ करण्यास आमचे प्राधान्य राहील, विशेषत: या व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचे शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहोत. पैसे मोजून सामना पाहण्यास येणाऱ्या प्रेक्षकांना आनंद देणे हे आमचे कामच आहे. शेवटी विजेतेपद हे प्रत्येकाचे अंतिम साध्य असते. सत्राचा समारोप चषक उंचावून करणे प्रत्येकासाठी स्वप्नवत असते. यंदाही मला हे माझ्या संघासाठी करायचे आहे. सिटीच्या चाहत्यांचा मला मिळणारा पाठिंबा वाखाणण्यासारखा असतो. त्यांच्यासाठी मला जास्तीत जास्त विजेतेपद मिळवायची आहेत.
गेली सात वर्षे तू मँचेस्टर सिटी संघाशी संलग्न आहे. या काळात संघाची खूपच भरभराट झाली, तुझा अनुभव कसा आहे?
सात वर्षांचा हा काळ खूपच ग्रेट होता. मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. आमचा संघ मँचेस्टर युनायटेड आणि बार्सिलोना यांच्यासारखा विजेता संघ म्हणून नावारुपास यावा यासाठी मी धडपडत असतो. आमचा संघ जिंकतो तेंव्हा साहजिकच मला आनंद होतो, कारण मला हरणे पसंत नाही.